गोवा : गोसेवक तथा शेतकरी कार्यकर्ता हनुमंत परब यांचे नाव पोलिसांच्या गुन्हेगारी सूचीतून वगळा !

समस्त हिंदुत्वनिष्ठ संघटनांची पोलीस महासंचालकांकडे मागणी

गोसेवक तथा शेतकरी कार्यकर्ता श्री. हनुमंत परब

पणजी, २५ एप्रिल (वार्ता.) – गोसेवक तथा शेतकरी कार्यकर्ता श्री. हनुमंत परब यांचे नाव पोलिसांच्या गुन्हेगारी सूचीतून वगळावे, अशी मागणी विविध हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी राज्याच्या पोलीस महासंचालकांकडे एका निवेदनाद्वारे केली आहे. या वेळी हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या शिष्टमंडळामध्ये ‘भारत माता की जय’, ‘पतंजलि योग समिती’, ‘गोमंतक मंदिर महासंघ’, प्राणीमित्र संघटना, ‘गोमंतक परशुराम सेना’, ‘गायित्री परिवार’, ‘गोवंश रक्षा अभियान’, वाळपई येथील ‘अखिल विश्व जय श्रीराम गोसंवर्धन केंद्र’, ‘केसरिया हिंदू वाहिनी’, शंखवाळ (साकवाळ) येथील ‘शंखावळी तीर्थक्षेत्र गोशाळा’, हिंदु जनजागृती समिती आदी हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या प्रतिनिधींचा सहभाग होता.

हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे कार्यकर्ते गोवा पोलिसांना निवेदन देण्यासाठी जात असतांना

गोव्यात नुकत्याच झालेल्या ‘जी-२०’ शिखर परिषदेच्या पार्श्वभूमीवर गोव्यात गोवंश रक्षणासाठी कृतीशील असलेले श्री. हनुमंत परब यांचे नाव गुन्हेगार सूचीत समाविष्ट करून त्यांना पोलीस ठाण्यात उपस्थिती लावण्यास सांगण्यात आले होते.

या पार्श्वभूमीवर समस्त हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी हे निवेदन पोलीस महासंचालकांना दिले. निवेदनात म्हटले आहे की,

‘‘सामाजिक कार्यकर्ते श्री. हनुमंत परब यांचे नाव गुन्हेगारी सूचीत समाविष्ट करणे ही पुष्कळ धक्कादायक गोष्ट आहे. श्री. हनुमंत परब हे समाजातील एक प्रतिष्ठित नागरिक आहेत आणि त्यांचा अनेक संघटनांमध्ये सक्रीय सहभाग आहे. श्री. हनुमंत परब हे वर्ष २००८ पासून वाळपई येथील ‘अखिल विश्व जय श्रीराम गोसंवर्धन केंद्रा’चे अध्यक्ष, वर्ष २०११ पासून ‘गोवंश रक्षा अभियान-गोवा’चे अध्यक्ष, वर्ष २०११ पासून ‘पिसुर्ले शेतकरी समिती’चे अध्यक्ष, वर्ष २००५ पासून ‘पिसुर्ले अर्बन’ संस्थेचे संस्थापक सदस्य आणि संचालक, वर्ष २०१८ पासून ‘गोवा राज्य प्राणी कल्याण मंडळा’चे सदस्य आणि वर्ष २०२१ पासून ‘एस्.पी.सी.ए.’चे व्यवस्थापकीय समितीचे सदस्य आहेत. समस्त हिंदुत्वनिष्ठ संघटनांचा मागील अनेक वर्षांपासून श्री. हनुमंत परब यांच्याशी जवळचा संबंध आहे. गुन्हेगारी सूचीत श्री. हनुमंत परब यांचे नाव समाविष्ट करण्याची कृती ही त्यांची प्रतिमा मलीन करण्याचा प्रयत्न आहे आणि हे दु:खद आहे. श्री. हनुमंत परब यांनी मागील अनेक वर्षे समाजात जे चांगले कार्य केले आहे, त्या कार्याचा हा अवमान आहे. गोसेवक तथा शेतकरी कार्यकर्ता हनुमंत परब यांचे नाव पोलिसांच्या गुन्हेगारी सूचीतून त्वरित वगळून त्यांना पुन्हा मानसन्मान आणि प्रतिष्ठा बहाल करावी.’’