कराड येथे जल्लोषपूर्ण वातावरणात ऐतिहासिक दरबार मिरवणूक पार पडली !

शिवजयंती कराड मिरवणूक २०२३

कराड, २४ एप्रिल (वार्ता.) – पारंपरिक शिवजयंती उत्‍सवानिमित्त ‘हिंदु एकता आंदोलना’च्‍या वतीने प्रतिवर्षी काढण्‍यात येणार्‍या ऐतिहासिक दरबार मिरवणुकीत तरुणाईसह आबालवृद्धांना मोठे आकर्षण असते. या वर्षीही छत्रपती शिवाजी महाराजांसह विविध वेशभूषा परिधान करून घोड्यावर स्‍वार झालेले युवक-युवती, पारंपरिक वाद्ये, वारकर्‍यांची दिंडी, ढोल पथक, मर्दानी खेळांची प्रात्‍यक्षिके, वैशिष्‍ट्यपूर्ण चित्ररथ, फटाक्‍यांची आतषबाजी, छत्रपती शिवाजी महाराज आणि राष्‍ट्रपुरुष यांच्‍या घोषणांनी गर्दीचा उच्‍चांक गाठत जल्लोषपूर्ण भगवामय वातावरणात ऐतिहासिक दरबार मिरवणूक पोलीस बंदोबस्‍तात पार पडली.

श्री पांढरीचा मारुति मंदिरापासून पालखी पूजनाने मिरवणुकीस प्रारंभ झाला. मिरवणुकीचा दत्त चौकात समारोप करण्‍यात आला. मिरवणुकीच्‍या मार्गावर रस्‍त्‍याच्‍या दुतर्फा मोठ्या संख्‍येने नागरिक उपस्‍थित होते. दुचाकी आणि रिक्‍शावर करण्‍यात आलेली महाराजांची मूर्ती अन् रायगडाच्‍या प्रतिकृतीची सजावट, छत्रपती शिवाजी महाराज, प्रभु श्रीराम आणि हनुमंताच्‍या भव्‍य मूर्तींनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले. मिरवणुकीत हिंदुत्‍वनिष्‍ठ, सामाजिक संघटनांचे पदाधिकारी, नगरसेवक, महिला आणि हिंदुत्‍वनिष्‍ठ मोठ्या संख्‍येने उपस्‍थित होते.

श्री शिवप्रतिष्‍ठान हिंदुस्‍थानच्‍या वतीने पारंपरिक ‘शिवजन्‍मोत्‍सव’ सोहळा साजरा !

श्री शिवप्रतिष्‍ठान हिंदुस्‍थानच्‍या वतीने छत्रपती शिवरायांच्‍या जयंतीनिमित्त अक्षय्‍य तृतीयेच्‍या दिवशी येथील शिवतीर्थावर शिवछत्रपतींचा पाळणा, तसेच पारंपरिक गीत म्‍हणत शिवजन्‍मोत्‍सव सोहळा साजरा करण्‍यात आला.