अमळनेर येथे जाण्यासाठी निघालेल्या महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या (‘एस्.टी.’च्या) एका बसच्या ‘ॲक्सिलरेटर’चे ‘पॅडल’ कसारा घाटात तुटले. त्यामुळे बस नाशिकपर्यंत जाणे शक्य नव्हते; पण चालकाने प्रसंगावधान राखून ॲक्सिलरेटरला दोरी बांधून बस नाशिकपर्यंत नेली. चालकाने स्टेअरिंग धरून बस चालवली, तर वाहकाने ॲक्सिलरेटरला बांधलेली दोरी हातात घेऊन नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न केला. या वेळी बसमध्ये प्रवासीही होते. बस सुखरूप गेली; म्हणून काही अडचण नाही, अनर्थ टळला. असे जरी असले, तरी बसगाड्यांच्या दुरुस्तीच्या संदर्भात येथे एक सूत्र उपस्थित होते. ॲक्सिलरेटरचे पॅडल तुटले, हे ऐनवेळी लक्षात आल्यावर वरील प्रकार करण्यात आला; पण ते तुटेपर्यंत प्रशासन का थांबते ? याआधीही अनेकदा एस्.टी.चे ब्रेक निकामी झाल्याने घाटांसारख्या ठिकाणी अपघात झाल्याच्या घटनाही घडल्या होत्या. मध्यंतरी एका बसमधील डिझेलच संपले होते; पण आता ही स्वतःची चूक प्रवाशांना कशी सांगणार ? या भयास्तव त्यांनी ‘डिझेलची टाकी गळत असल्याने ते संपले आहे’, असे खोटे कारण प्रवाशांना सांगितले. डिझेलअभावी बस मुंबई-पुणे या द्रुतगती महामार्गावर बंद पडल्याने प्रवाशांना तेथेच उतरवण्यात आले. या घटना एस्.टी.च्या दृष्टीने गंभीर आणि तितक्याच लज्जास्पदही आहेत. एस्.टी.च्या बसगाड्या दूरपर्यंत प्रवास करत असतात. अशा वेळी त्यांच्या दुरुस्तीच्या दृष्टीने कोणती प्रक्रिया केली जाते ? बसची प्राथमिक पडताळणी प्रवासाच्या पूर्वी करणे आवश्यक असते; परंतु वरील घटना पहाता ती केली जात नसावी. ती न करताच प्रवास चालू झाला आणि अशातच अनर्थ ओढावून भीषण अपघात झाल्यास त्याला उत्तरदायी कोण ? बसगाड्यांची योग्य ती देखभाल दुरुस्ती न करता प्रत्येक वेळी प्रवाशांनाच दावणीला बांधणार्या महामंडळातील उत्तरदायींवर कठोर कारवाईच व्हायला हवी.
महामंडळाच्या बसगाड्यांवर ‘निर्णय वेगवान आणि महाराष्ट्र गतीमान’, अशा आशयाची विज्ञापने लावली जातात; पण बसगाड्यांची तर दुर्दशा झालेली असते. ‘एस्.टी.च्या बसगाड्यांमध्ये बसतांना आपण इच्छित स्थळी सुरक्षित पोचू ना ?’, असे प्रवाशांना वाटत असते. त्यामुळे ते जीव मुठीत धरूनच प्रवास करतात. प्रत्येक प्रवाशाचा प्रवास सुखरूप आणि सुरक्षित होऊ देणे, हे महामंडळाचे दायित्व अन् कर्तव्य आहे. प्रवासाला कोणतेही गालबोट लागू न देता ते त्यांनी यथोचित पार पाडावे, ही अपेक्षा !
– सौ. नम्रता दिवेकर, सनातन आश्रम, देवद, पनवेल.