कुत्र्यांच्या निर्बीजीकरणाखाली कुडाळ नगरपंचायतीची लाखो रुपयांची उधळपट्टी ! – विलास कुडाळकर, गटनेता, भाजप

कुडाळ – शहर नगरपंचायतीने भटक्या कुत्र्यांचे निर्बीजीकरण आणि लसीकरण माहिमेच्या अंतर्गत १७ दिवसांत ५०० कुत्र्यांवर शस्त्रक्रिया केली, असा अहवाल दिला. या अहवालावरून मोहिमेत मोठ्या प्रमाणात घोटाळा झाल्याचे दिसून येत असून नगरपंचायतीने जनतेच्या लाखो रुपयांची उधळपट्टी केली आहे. या प्रकरणाची चौकशी व्हावी आणि तोपर्यंत मोहीम राबवणार्‍या ठेकेदार संस्थेचे देयक देऊ नये, अशी मागणी जिल्हाधिकार्‍यांकडे केल्याची माहिती नगरपंचायतीचे भाजपचे गटनेता तथा नगरसेवक विलास कुडाळकर यांनी दिली.

भाजपचे गटनेता विलास कुडाळकर

कुडाळ नगरपंचायतीने २६ नोव्हेंबर ते १२ डिसेंबर २०२२ या कालावधीत ही मोहीम राबवली. यासाठी नगरपंचायतीच्या स्वनिधीतून निधी उपलब्ध करण्यात आला. या मोहिमेत भ्रष्टाचार झाल्याचा संशय आल्याने कुडाळकर यांनी नगरपंचायतीचे मुख्याधिकारी यांच्याकडे २१ मार्च २०२३ या दिवशी विविध १२ सूत्रांविषयी माहिती मागितली. नगरपंचायतीने माहिती देतांना ‘किती कुत्रे पकडले ? ठेकेदार आस्थापनाशी झालेला करार, काही कुत्र्यांची छायाचित्रे आणि शासकीय पशूवैद्यकीय अधिकारी यांची माहिती देणारे पत्र दिले; मात्र इतर महत्त्वाच्या सूत्रांची माहिती दिली नाही. जर या मोहिमेत भ्रष्टाचार झाला नाही, तर अन्य सूत्रांची माहिती का दिली नाही ? या मोहिमेत पकडलेले कुत्रे, उपचार केलेले कुत्रे यांच्या संख्येचा ताळमेळ बसत नाही. ठेकेदार आस्थापनाने एका कुत्र्याच्या मागे १ सहस्र ८९० रुपये आकारले आहेत. एवढा खर्च होत असतांना त्यावर नियंत्रण ठेवणारी नगरपंचायतीची यंत्रणा नाही, असे कुडाळकर यांनी सांगितले.