म्हापसा, १९ एप्रिल (वार्ता.) – नेरूल येथील श्री कालीमाता मंदिर पाडण्याच्या नोटिशीवरून गावात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. नेरूल येथील श्री कालीमाता मंदिर पाडण्याविषयी न्यायालयाचा आदेश असल्याची एक प्रत सामाजिक माध्यमातून फिरू लागली. मंदिर पाडले जाऊ नये, यासाठी भक्तगण, तसेच राज्यातील अनेक हिंदुत्वनिष्ठ संघटना संघटित झाल्या आहेत.
निर्ला, साळगाव येथील श्री कालीमाता मंदिर पूर्वीपासून आहे. या ठिकाणी प्रतिमास अमावास्या साजरी केली जाते, तसेच प्रतिवर्ष मंदिरात जत्रोत्सवही होत असतो. मंदिरात इतर अनेक महोत्सवही होत असतात. स्थानिकांच्या मते ही भूमी कोमुनिदादची आहे; मात्र मंदिराच्या रक्षणासाठी स्थानिक ग्रामस्थ कुठलाही त्याग करण्याच्या सिद्धतेत आहेत. मंदिर पाडण्याविषयी न्यायालयाचा आदेश असल्याची माहिती सामाजिक माध्यमातून फिरू लागल्यावर भक्तगणांनी दिलेल्या हाकेनंतर सर्व भक्तगण आणि हिंदुत्वनिष्ठ संघटना १९ एप्रिल या दिवशी देवस्थानच्या ठिकाणी जमले.
(सौजन्य : In Goa 24×7)
या वेळी उपस्थित पत्रकारांना स्थानिक भक्तगण सौ. शशिकला गोवेकर, श्री. बाप्पा कोरगावकर, सौ. विनंती कलंगुटकर आदींनी संबोधित करून मंदिराची पार्श्वभूमी आणि मंदिराच्या रक्षणासाठीच्या लढ्याविषयी माहिती दिली. याप्रसंगी ‘परशुराम गोमंतक सेने’चे श्री. शैलेंद्र वेलिंगकर, ‘केसरिया हिंदू वाहिनी’चे श्री. राजीव झा, ‘शिव प्रतिष्ठान डिचोली संघटने’चे श्री. मंदार गावडे, ‘समर्थ गड मडगाव’चे श्री. कुलकर्णी, विनायक मुंग्रे, गोमंतक मंदिर महासंघाचे अध्यक्ष श्री. चंद्रकांत (भाई) पंडित, सचिव श्री. जयेश थळी, ‘रणरागिणी’च्या सौ. राजश्री गडेकर आदींची उपस्थिती होती.
देवीला हिंदु राष्ट्रासाठी साकडे
याप्रसंगी भक्तगणांनी देवतेच्या चरणी भारतात लवकरात लवकर हिंदु राष्ट्राची स्थापना व्हावी, तसेच विश्वकल्याण व्हावे, अशी प्रार्थना केली.