गुरूंनी काय दिधले मज !

‘एक साधकाला काही कारणांमुळे घरी जावे लागले होते. त्‍याविषयी मला काहीच ठाऊक नव्‍हते. अचानक एक दिवस त्‍याच्‍याशी फोनवर संपर्क झाला. तेव्‍हा बोलतांना तो मला म्‍हणाला, ‘‘गुरूंनी मला काय दिले ? मी तर आज पुष्‍कळ कष्‍ट भोगत आहे.’’ त्‍याचे बोलणे ऐकल्‍यावर मला जाणीव झाली, ‘गुरु ऐहिकातील काहीच देत नसतात. ते साधकाचे आध्‍यात्मिक ध्‍येय पूर्ण करण्‍याच्‍या वाटचालीसाठी साहाय्‍य करतात.’ तेव्‍हा मला येथे दिलेल्‍या काव्‍यपंक्‍ति सुचल्‍या.’

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

गुरूंनी काय दिधले मज ।
पुसतसे एक जीव मज ॥ १ ॥

श्री. धैवत वाघमारे

प्रश्‍न तो गहन आज ।
विकल्‍प ठेवता, न सुचे मज ॥ २ ॥

चिंतन करण्‍याची संधी आज ।
उत्तर सुचवी भगवंत मज ॥ ३ ॥

इंद्रिये बांधिले पाशात मज ।
गुरुमाऊलीने सोडविले त्‍यांतून ॥ ४ ॥

कर्म होते महाभयंकर ।
परि ओरखडा न उठला जिवावर ॥ ५ ॥

लिलया खेचूनी आणिले मज ।
तोडोनी पाश सर्व चरणी ठेविले मज ॥ ६ ॥

ऐसी शिदोरी दिधली मज ।
वाट चालण्‍या जी दीपस्‍तंभासम ॥ ७ ॥

प्रेम दिधले सगुणाचे जे ओढ लावी चरणांची ।
करूनी घेतली सेवा जिच्‍यापरी पूर्वकर्मे जळती ॥ ८ ॥

मन होई आसक्‍त जरी मम ।
व्‍यर्थता त्‍याची दाविती क्षणोक्षणी मज ॥ ९ ॥

नाम दिधले तयांनी जाई जे जिवासंगे ।
चरणसेवा दिधली जी नष्‍ट करी अहंगंडास ॥ १० ॥

सेवेचे साधन दिधले ऐसे ।
विसरूनी जात असे सर्व मोहपाश ॥ ११ ॥

आणिले ऐशा ठायी मज ।
जेथोनी चालणे केवळ तयांच्‍या सवे ॥ १२ ॥

फेडिली कर्मे सर्व देऊनी चरणसेवा ।
सगुणस्‍पर्शे लाविली ओढ या जिवा ॥ १३ ॥

कृतज्ञतेच्‍या जाणिवे शांत केले चित्ता ।
दाविले समाधान ते कैसे लाभे चित्ता ॥ १४ ॥

वाट दाविली गुरूंनी आजीवनी वाटचालीस ।
दिधले ऐसे संस्‍कार तयांनी
येती सवे ऐहिके-पारलौकिके ॥ १५ ॥

जीवनासी दिधला अर्थ माझ्‍या ।
दावूनी उत्तुंग ध्‍येय साधण्‍या ॥ १६ ॥

कृतज्ञ कृतज्ञ असे मी ।
आलो शरण तव चरणा ॥ १७ ॥

इतिश्री व्‍हावी जीवनाची स्‍मरणी तुमच्‍या ।
हीच आस अन् प्रार्थना चरणी तुमच्‍या ॥ १८ ॥

– श्री. धैवत वाघमारे, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२३.१०.२०२२)

या कवितेत प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या भाव तेथे देव या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक