भारत हे हिंदु राष्ट्र होते, आहे आणि राहील ! – भाजपच्या ट्विटर खात्यावरून संदेश

मुंबई – भाजपच्या अधिकृत ट्विटर खात्यावरून हिंदु राष्ट्राच्या संदर्भात एक ‘पोस्ट प्रसारित केली आहे. ‘कुणी कितीही धर्मनिरपेक्षतेचा बुरखा पांघरला, लांगूलचालन केले, तरी त्यांच्या मागण्या न मानण्याने आम्हास फरक पडत नाही. भारत हे हिंदु राष्ट्र होते, हिंदु राष्ट्र आहे आणि हिंदु राष्ट्रच राहील’, असे त्या संदेशात म्हटले आहे. या संदर्भातील ‘पोस्ट’मध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे छायाचित्रही लावण्यात आले आहे.

यावर विरोधकांनी टीका केली आहे. महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी, ‘जे लोक देशाच्या घटनेला मानत नाहीत, त्या लोकांकडून आणखी काय अपेक्षा केली पाहिजे ? त्यामुळे भारत हा भारत आहे. भारताची घटना आहे म्हणूनच ते उपमुख्यमंत्री झाले आहेत. घटना नसती, तर ते उपमुख्यमंत्री होऊ शकले नसते’, अशी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

(भारत अनादी काळापासून हिंदु राष्ट्रच होते. त्रेतायुगातील राजा हरिश्‍चंद्र आणि प्रभु श्रीराम, द्वापरयुगातील महाराजा युधिष्ठिर, कलियुगातील राजा हर्षवर्धन, अफगाणिस्तानचा राजा दाहीर, मगधचा सम्राट चंद्रगुप्त, महाराणा प्रताप, छत्रपती शिवाजी महाराज आदींचे राज्य कधीही ‘सेक्युलर’ नव्हते, तर ‘हिंदु राष्ट्र’च होते. या सर्व राज्यांचा उल्लेख आजही गौरवानेच केला जातो. पुष्कळ मागे जायला नको, वर्ष १९४७ मध्येही ५६६ संस्थाने हिंदु राज्ये होती. स्वातंत्र्यानंतर मात्र काँग्रेसने निधर्मी राज्यप्रणाली हिंदूंच्या माथी मारली आणि देशाला रसातळाला नेले ! – संपादक)

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी, ‘जगाच्या पाठीवर अनेक ठिकाणी हिंदु समाज गेला आहे. अमेरिकेत कोणत्याही जाती-धर्मावरून अजिबात भेदभाव केला जात नाही. त्यामुळे त्या देशाने वेगाने प्रगती केली. त्याच पद्धतीने भारतही धर्मनिरपेक्ष विचाराने प्रगती करत आला. आता अशी भूमिका काही प्रमुख नेते मांडत असतील, तर ती चिंतेची गोष्ट आहे,’’ असे मत व्यक्त केले आहे. (केवळ अमेरिकाच नाही, तर फ्रान्स, इंग्लंड आणि अनेक देश ते ख्रिस्ती असल्याचे अधिकृतरित्या सांगतात, तर भारतात बहुसंख्य हिंदू असूनही भारत हिंदु राष्ट्र का होऊ शकत नाही ? याचे उत्तर जयंत पाटील देतील काय ? – संपादक)