‘ट्विटर’ची खळखळ!

‘ट्विटर’ आस्थापनाचे मालक इलॉन मस्क

‘ट्विटर’ आस्थापनाचे मालक इलॉन मस्क यांनी ‘भारतात सामाजिक माध्यमांमध्ये कठोर निर्बंध आहेत. त्यामुळे आमचे संकेतस्थळ अमेरिका किंवा इतर पाश्चात्त्य देशांतील ‘ट्विटर’ वापरकर्त्यांना जेवढे स्वातंत्र्य देते, तेवढे स्वातंत्र्य भारतीय ‘ट्विटर’कर्त्यांना देऊ शकत नाही. ‘ट्विटर’ आस्थापन कधी कधी भारतात काही लिखाण ‘सेन्सॉर’ करते. जर आमच्या आस्थापनाने भारत सरकारचे नियम पाळले नाहीत, तर आमच्या कर्मचार्‍यांना कारागृहात पाठवले जाऊ शकते’, असे विधान केले आहे. वास्तविक इलॉन मस्क यांचे हे विधान म्हणजे ‘चोराच्या उलट्या बोंबा’ अशांपैकीच एक म्हणावे लागेल. यापूर्वी गेल्या अनेक वर्षांचा ‘ट्विटर’चा इतिहास पडताळून पाहिल्यास हिंदू आणि भारत यांची अपकीर्ती करण्याच्या मोहिमेत नेहमीच ‘ट्विटर’चा पुढाकार राहिला आहे. त्यामुळे इतकी वर्षे नियम पाळण्याची सवयच नसलेल्यांना कायद्यांचे वेसण सहन होत नसल्याने ‘आमचे कर्मचारी कारागृहात जाऊ शकतात’, अशी दिशाभूल करणारी विधाने केली जात आहेत.

हिंदुविरोधी कारवायांसाठी वापर !

गेल्या काही मासांपासून ऑस्ट्रेलिया देशात हिंदूंची मंदिरे, तसेच भारताच्या समर्थक लोकांवर खलिस्तान समर्थकांकडून हिंसक आक्रमणे करण्यात येत आहेत. याचा शोध घेतल्यावर पाकिस्तानातील एका गटाची (बॉटसची) ‘ट्विटर’वर सहस्रो खोटी खाती असून हा गट मंदिरांवर आक्रमण करण्यासाठी प्रवृत्त करतो, असे समोर आले. यापूर्वी स्विडनची कथित पर्यावरणवादी ग्रेटा थनबर्ग हिने भारतातील शेतकरी आंदोलनाच्या समर्थनार्थ ट्वीट करत एक लिखाण (टूलकिट) प्रसारित केले होते. या ‘टूलकिट’मध्ये देहलीतील शेतकरी आंदोलन कशा प्रकारे करण्यात यावे, याचे संपूर्ण दिशानिर्देश देण्यात आले होते. कुणी कधी आणि काय करावे ? याचे वेळापत्रक देण्यात आले होते, तसेच २६ जानेवारीला झालेल्या आंदोलनाचेही नियोजन त्यात होते.

या उदाहरणांवरून हिंदुविरोधी कारवायांसाठी ‘ट्विटर’चा आंतरराष्ट्रीय स्तरावर वापर होत असल्याचेच समोर येते. खरे तर ‘अशा प्रकारे एका समुदायाच्या विरोधात, तसेच राष्ट्रविरोधी कारवाया होत आहेत’, हे लक्षात आल्यावर ‘ट्विटर’ने तात्काळ अशी खाती बंद करणे आवश्यक आहे; मात्र तसे काहीच होतांना दिसत नाही.

भारतातील पालटलेले कायदे !

यापूर्वी ‘ट्विटर’ असो वा अन्य कुणीही माध्यम असो, ते खोटे लिखाण हटवण्यासाठी बांधील नसत किंवा हटवण्यास सांगितल्यावर ते लिखाणही काढत नसत. वर्ष २०१४ नंतर आलेल्या सरकारने मात्र विदेशी आस्थापनांचा हा उद्दामपणा लक्षात घेऊन हळूहळू कायद्यांमध्ये पालट करण्यास प्रारंभ केला. गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्येच सरकारने सामाजिक माध्यमांमध्ये उपलब्ध सामुग्री आणि इतर समस्यांविषयी प्रविष्ट केलेल्या तक्रारींचे योग्य निराकरण करण्यासाठी ‘आयटी’च्या नियमांमध्ये पालट करून ३ मासात अपिल समित्या स्थापन करण्याची घोषणा केली. या समित्या ‘मेटा’ (फेसबुक) आणि ‘ट्विटर’सारख्या सामाजिक माध्यम वापरणार्‍या आस्थापनांचा सामुग्री नियमनाविषयी घेतलेल्या निर्णयांचा आढावा घेतील, असे घोषित केले. हा आढावा घेतल्यावर काही सूचना केल्यावर त्या ‘ट्विटर’सारख्यांना जाचक वाटू लागल्या.

नवीन कायद्यांनुसार भारत सरकारने स्पष्ट केले आहे की, खोट्या खात्याच्या संदर्भात तक्रार आल्यानंतर कोणतेही सामाजिक माध्यम चालवणार्‍या आस्थापनांना २४ घंट्यांमध्ये खोटी खाती हटवावी लागतील. जर कोणत्याही प्रसिद्ध व्यक्तीने संबंधित माध्यमांवर त्यांच्या नावाने खोटे खाते चालवल्याविषयी तक्रार केली, तर आस्थापनाला त्यावर त्वरित कारवाई करावी लागेल.

कठोर निर्बंध आवश्यक !

‘ट्विटर’, फेसबुक, ‘इंस्टाग्राम’, ‘व्हॉटस्ॲप’ अथवा अन्य कोणतेही सामाजिक प्रसारमाध्यम असो, आजपर्यंत यांना ‘आम्ही म्हणू तीच पूर्वदिशा’, अशी स्थिती होती. राष्ट्रहिताचे काम करणार्‍या ‘हिंदु जनजागृती समिती’चे १५ लाख फॉलोअर असलेले फेसबुकचे पृष्ठ कोणतीही पूर्वसूचना न देता बंद करण्यात आले. काही हिंदुत्वनिष्ठांची पानेही अशाच प्रकारे बंद करण्यात आली होती. भारतात राहून हिंदुत्व, धर्म, अध्यात्म यांचा प्रचार करण्यास सामाजिक माध्यमांत बंदी हे खरे तर अनाकलनीयच होते; मात्र यांचे मालक विदेशी असल्याने, त्यांचे नियंत्रण विदेशातून केले जात असल्याने फेसबुकचा मनमानी कारभार सहन करावा लागत होता. गेल्या काही वर्षांपासून मात्र या स्थितीत काही प्रमाणात पालट होत आहे. भारत सरकार आणि काही प्रमाणात न्यायालय यांनी तंबी दिल्यावर ज्याप्रमाणे इलॉन यांची भाषा पालटली, त्याचप्रमाणे फेसबुकचे सर्वेसर्वा मार्क झुकेरबर्ग यांचीही भाषा पालटण्यास वेळ लागणार नाही.

‘ट्विटर’ किंवा अन्य सामाजिक माध्यमांचे मालक हे उद्दाम असतात. अभिव्यक्तीस्वातंत्र्याच्या नावाखाली त्यांनी मांडलेला बाजार हा हिंदु धर्म, प्रथा आणि परंपरा यांच्या मुळावर उठला आहे. त्यामुळे अशांवर चाप बसायलाच हवा. अलीकडच्या काळात भारतातील लोक प्रचंड मोठ्या प्रमाणात सामाजिक माध्यमे वापरतात. त्यामुळे त्याचा अंतिम परिणाम लक्षात घेऊन हिंदुविरोधी, राष्ट्रविरोधी, तसेच वस्तूस्थिती नसलेले कोणतेही लिखाण सामाजिक माध्यमांतून प्रसारित झाल्यास तो तात्काळ तेथून काढला गेलाच पाहिजे. यासाठी भारत सरकारने कठोर पावले उचलणे आवश्यक आहे. त्यासाठी भारत सरकारने कठोर नियमावली बनवून ती ‘ट्विटर’, फेसबुक यांसारख्या अग्रगण्य आस्थापनांना पाळण्यास भाग पाडले पाहिजे. असे केले, तरच मस्क यांच्यासारखे ताळ्यावर येतील.

मनमानी कारभार करणार्‍या ‘ट्विटर’, ‘फेसबुक’ यांसारख्या विदेशी आस्थापनांना भारतीय कायद्यांचे वेसण अत्यावश्यक !