‘ई-स्टोर इंडिया’कडून सिंधुदुर्गातील गुंतवणूकदारांची १०० कोटी रुपयांची फसवणूक

गुंतवणूकदारांचे पैसे परत न मिळाल्यास मोर्चा काढणार ! – मनसेची चेतावणी

कणकवली – ‘ई-स्टोर इंडिया’ या आस्थापनाने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील गुंतवणूकदारांची मोठी फसवणूक केली आहे. या आस्थापनाने जिल्ह्यात ४०० कोटी रुपयांचा व्यवसाय केला असून जिल्ह्यातील गुंतवणूकदारांची १०० कोटी रुपयांची फसवणूक केली आहे. या गुंतवणूकदारांचे पैसे परत न मिळाल्यास मनसेच्या वतीने मोर्चा काढणार असल्याची माहिती मनसेचे नेते परशुराम उपरकर यांनी १० एप्रिल या दिवशी पत्रकार परिषदेत दिली. येथील मनसे संपर्क कार्यालयात उपरकर यांनी पत्रकार परिषद घेतली.

 (सौजन्य : Kokansad Live)

या वेळी उपरकर म्हणाले,

‘‘ई स्टोर इंडिया’ आस्थापनाकडून फसवणूक झाल्याचे निवेदन दलालांनी (एजंट) जिल्हाधिकार्‍यांना दिले आहे. ‘गुंतवणुकीनंतर दुप्पट रक्कम मिळेल’, अशी ग्वाही या आस्थापनाने दिली होती; मात्र आता आस्थापनाने कणकवली आणि फोंडाघाट येथील कार्यालये बंद केली आहेत. त्यामुळे गुंतवणूकदारांची मोठी फसवणूक झाली आहे. ज्या गुंतवणूकदारांची फसवणूक झाली आहे, त्यांनी २० एप्रिलपर्यंत स्वतःकडील कागदपत्रे घेऊन कणकवली येथील मनसे कार्यालयात संपर्क साधावा. तक्रारदारांसह पोलीस अधीक्षकांची भेट घेऊन गुंतवणूकदारांना पैसे परत मिळण्यासाठी प्रयत्न करू.’’