गोव्यात अल्पवयीन मुली गर्भवती होण्याच्या घटनांमध्ये वाढ !

प्रत्येक मासाला सुमारे २ प्रकरणे उजेडात येत असल्याचा ‘पीडित साहाय्यता केंद्रा’चा दावा

पणजी, ५ एप्रिल (वार्ता.) – गोव्यात अलीकडच्या काळात अल्पवयीन मुली गर्भवती होण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. यापूर्वी प्रत्येक ६ मासांमध्ये अल्पवयीन मुली गर्भवती होण्याच्या १ किंवा २ घटना नोंद होत असत, तर आता दर मासाला सुमारे २ प्रकरणांची नोंद होत आहे, अशी माहिती राज्य सरकारच्या ‘पीडित साहाय्यता केंद्रा’कडून उपलब्ध झाली आहे.

‘पीडित साहाय्यता केंद्रा’चे प्रमुख ईमीडियो पिन्हो म्हणाले,

पीडित साहाय्यता केंद्रा’चे प्रमुख ईमीडियो पिन्हो

‘‘अल्पवयीन मुली गर्भवती रहाण्याविषयी अनेक प्रकरणांमध्ये पालक किंवा शाळेतील शिक्षकवर्ग अनभिज्ञ असतात, असे लक्षात आले आहे. काही प्रकरणांमध्ये अल्पवयीन मुलीने पोटात दुखू लागल्याची तक्रार केल्यानंतर वैद्यकीय चाचणीत ती गर्भवती असल्याचे उजेडात आले आहे. यानंतर गुन्हा नोंदवला जाऊन हे प्रकरण ‘पीडित साहाय्यता केंद्रा’त नोंदवण्यात आले आहे. बहुतेक प्रकरणांमध्ये गुन्हेगार हे ३० ते ४० वर्षे वयोगटातील आहेत आणि ते पीडित कुटुंबियांच्या ओळखीचे आढळले आहेत. एका प्रकरणामध्ये संशयित पीडितेच्या घराशेजारी भाडेपट्टीवर रहात होता. काही संशयितांनी ‘इस्टाग्राम’ किंवा ‘स्नॅपचॅट’ या सामाजिक माध्यमांद्वारे अल्पवयीन पीडितांना लक्ष्य केले आहे. अल्पवयीन मुलीला फसवून तिच्याशी संबंध ठेवले जात असल्याच्या अनेक घटना आहेत.

सहाव्या इयत्तेपासून मुलांना लैंगिक शिक्षण द्यावे ! – ‘पीडित साहाय्यता केंद्रा’चा प्रस्ताव

अल्पवयीन मुली गर्भवती होण्याच्या घटना होऊ नयेत, यासाठी सहाव्या इयत्तेपासून मुलांना लैंगिक शिक्षण द्यावे, असा प्रस्ताव ‘पीडित साहाय्यता केंद्रा’ने सिद्ध केला आहे. तसेच पालकांनी त्यांच्या पाल्यांना वेळ देऊन त्यांच्याशी भावनिक नाते निर्माण केले पाहिजे. (अल्पवयीन मुलींना लैंगिक शिक्षण देणे हा उपाय ‘रोगापेक्षा उपाय भयंकर’, असा होऊ शकतो. पाश्चात्त्य देशांत असे शिक्षण दिले जात असले, तरी तेथे लहान वयातच मुले स्वैराचारी बनतात. लैंगिक शिक्षण देणे मुलींना एकवेळ गर्भवती रहाण्यापासून वाचवू शकेल; पण तिची अब्रू कशी वाचणार ? – संपादक)

(चित्रावर क्लिक करा)

संपादकीय भूमिका

  • समाजाला धर्मशिक्षण देणे किती आवश्यक आहे, ते यातून लक्षात येते !
  • अश्लील आणि कामोत्तेजक व्हिडिओ, वेब सिरीज, आदी गोष्टी याला कारणीभूत आहेत. त्याचप्रमाणे पालकांनी मुलांना शालेय वयातच भ्रमणभाष देणे, ही गोष्टही कारणीभूत आहे.
  • समाजाचे स्वैराचारी वर्तन रोखणे आणि समाजाला धर्मशिक्षण देणे हाच यावरील उपाय आहे.