सतत शिकण्याच्या स्थितीत रहाणारे आणि इतरांचा विचार करणारे सद्गुरु सत्यवान कदम (वय ६० वर्षे) !

सद्गुरु सत्यवान कदम यांच्याविषयी श्री. मनोज कुवेलकर यांना जाणवलेली गुणवैशिष्ट्ये येथे देत आहोत.

सद़्‍गुरु सत्‍यवान कदम

१. सतत शिकण्याच्या स्थितीत रहाणारे आणि ‘इतरांनी शिकावे’, अशी तळमळ असणारे सद्गुरु सत्यवानदादा !

‘कुडाळ येथील सनातनच्या सेवाकेंद्रात गुरुपौर्णिमेच्या विज्ञापनाची सेवा करतांना संगणकांत अनेक अडचणी येत होत्या. त्या अडचणी सोडवण्यासाठी मी कुडाळ सेवाकेंद्रात गेलो होतो. त्या वेळी मी तेथे संगणकांची दुरुस्ती करतांना सद्गुरु सत्यवानदादाही माझ्या समवेत होते. मी सद्गुरु दादांना म्हणालो, ‘‘मी दुरुस्ती करतो. तुम्ही समवेत नसलात, तरी चालेल. दुरुस्ती झाल्यावर मी तुम्हाला सांगतो.’’ तेव्हा ते मला म्हणाले, ‘‘उद्या संगणक परत बिघडला आणि दुरुस्त करणारे कुणी नसेल, तर मला तो दुरुस्त करता आला पाहिजे. यासाठी मी ते शिकून घेत आहे. ईश्वरकृपेने अडचण सुटली, तर सेवा थांबणार नाही, तसेच तुम्हालाही गोव्याहून इकडे बोलावण्याची आवश्यकता पडणार नाही. इकडच्या संगणक हाताळणार्‍या साधकांना तुम्ही जायच्या आधी प्राथमिक टप्प्याची दुरुस्ती शिकवून जा.’’

श्री. मनोज कुवेलकर

२. परिस्थिती सहजतेने स्वीकारून नेहमी इतरांचा विचार करणारे आणि साधकांप्रती प्रेमभाव असणारे सद्गुरु सत्यवानदादा !

वर्ष २०१९ मध्ये सद्गुरु दादा, श्री. दिनेश शिंदे आणि मी एका साधकाच्या मुलीच्या लग्नाला दहिसर, मुंबई येथे गेलो होतो. त्या साधकाने आम्हाला रहाण्यासाठी एका इमारतीत एक खोली दिली होती. खोलीतील स्नानगृहातील दिवा आणि अंघोळीसाठी पाणी गरम करण्याचा ‘गिझर’ नादुरुस्त होता. त्यामुळे तेथे आम्हाला अंधारात आणि थंड पाण्याने अंघोळ करावी लागली. त्या वेळी ‘आपल्याकडे संत येणार आहेत, तर त्या साधकाने सर्व सिद्धता व्यवस्थित करायला पाहिजे’, असे मला वाटले. माझ्या मनात आलेल्या विचारांबद्दल मी सद्गुरु दादांना सांगितले. त्या वेळी सद्गुरु दादा मला म्हणाले, ‘‘असा विचार मनात येणे चुकीचे आहे. मुलीच्या घरी लग्नाची धावपळ करणारे कुणीच नसल्याने लग्नाची सर्व सिद्धता त्यांनाच करावी लागत आहे. आपण कुठेही गेलो, तरी आपल्याला प.पू. गुरुदेवांनी (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी) ‘आहे त्या परिस्थितीत रहायला’ शिकवले आहे. त्याप्रमाणे आपल्याला वागता आले पाहिजे. ‘स्नानगृहातील दिवा चालू नसेल, तर अन्य खोलीत अतिरिक्त असलेला दिवा काढून तेथे लावून पाहू शकतो का ?’, अशी उपाययोजना आपल्यालाच सुचली पाहिजे.’’ यामधून मला सद्गुरु दादांचा साधकांप्रती असलेला प्रेमभाव आणि इतरांचा विचार करणे, हे गुण मला शिकायला मिळाले.’

– श्री. मनोज कुवेलकर (आध्यात्मिक पातळी ६६ टक्के), कवळे, फोंडा, गोवा. (२०.३.२०२३)