मागील १५ मासांमध्ये सोलापूर जिल्ह्यातील १ सहस्र ८४४ महिला-मुली बेपत्ता !

५४६ मुली-महिला-युवती अद्याप सापडलेल्या नाहीत

( प्रतिकात्मक छायायाचित्र )

सोलापूर – मागील १५ मासांमध्ये शहराच्या तुलनेत ग्रामीण भागांतून अल्पवयीन मुली, युवती आणि महिला बेपत्ता होण्याचे, तसेच घर सोडून निघून जाण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. जानेवारी २०२२ ते मार्च २०२३ या १५ मासांच्या कालावधीत सोलापूर शहरातील १०७ अल्पवयीन मुली, तर ४८७ युवती, महिला बेपत्ता झाल्याची नोंद पोलिसांत झाली आहे. दुसरीकडे ग्रामीणमधील १ सहस्र २५० मुली, महिला बेपत्ता झाल्या आहेत. त्यातील ५४६ मुली, युवती, महिला अद्याप सापडलेल्या नाहीत.

( सौजन्य : सत्य दर्शन चॅनेल )
सासरच्या सततच्या छळाला कंटाळून काही महिला घर सोडून निघून गेल्या आहेत, तर प्रेमप्रकरणातून विवाहाचे आमीष दिल्याने अनेक मुली-महिला त्यांच्या आवडीच्या व्यक्तीसमवेत पळून गेल्याचे पोलिसांनी सांगितले. सामाजिक प्रसारमाध्यमांचा वापर वाढला असून समोरील व्यक्तीकडून त्या मुलीला किंवा महिलेला अनेक प्रलोभने दाखवली जातात. त्यातूनही पळून जाण्याचे प्रमाण वाढल्याचे पोलिसांचे निरीक्षण आहे.

संपादकीय भूमिका

मुली आणि महिला यांनी बेपत्ता होणे, हे गंभीर अन् चिंताजनक आहे. प्रतिकूल परिस्थितीला सामोरे जाता येण्यासाठी मुलींवर लहानपणापासूनच संस्कार करणे आवश्यक आहे !