सातारा जिल्ह्यात महावितरणकडून १० सहस्र ३७६ शेतकर्‍यांच्या शेती पंपांना विद्युत् पुरवठा


सातारा, ३० मार्च (वार्ता.) – सिंचनाची व्यवस्था असेल, तर शेतकरी शेतात विविध पिके घेऊन आर्थिक उन्नती साधू शकतो. या उद्देशाने महावितरणने कार्यक्षेत्रातील यंत्रणांना शेती पंप जोडणीविषयी कालबद्ध कार्यक्रम आखून दिला. त्यानुसार वर्ष २०२२-२३ या आर्थिक वर्षात १० सहस्र ३७६ शेतकर्‍यांच्या शेती पंपांना विद्युत् पुरवठा करण्यात आला आहे. जिल्ह्यातील २०५ हून अधिक शेतकर्‍यांनी सौर कृषी पंपांचा लाभ घेतला आहे.

रात्रीऐवजी दिवसा वीजपुरवठा करा ! – शेतकर्‍यांची मागणी

अनेक उद्योग-व्यवसायांना दिवसा वीजपुरवठा केला जातो; मात्र ग्रामीण भागात शेतीसाठी दिवसा नाही, तर रात्री अखंड वीजपुरवठा केला जातो. त्यामुळे शेतकर्‍यांना रात्री-अपरात्री विजेरी घेऊन शेताच्या बांधावर जाऊन पिकांना पाणी द्यावे लागते. त्यामुळे शेतकर्‍यांना रात्रीऐवजी दिवसा वीजपुरवठा करावा, अशी शेतकर्‍यांची मागणी आहे.