म. गांधी यांच्याकडे कोणतीही पदवी नव्हती !  

जम्मू-काश्मीरचे उपराज्यपाल मनोज सिन्हा यांचा दावा

म. गांधी (डावीकडे) जम्मू-काश्मीरचे उपराज्यपाल मनोज सिन्हा (उजवीकडे)

ग्वाल्हेर (मध्यप्रदेश) – आपल्यापैकी अनेकांना वाटते की, म. गांधी यांच्याकडे कायद्याची पदवी होती; मात्र हे खरे नाही. त्यांच्याकडे कोणतीही पदवी नव्हती. त्यांचे शिक्षण केवळ माध्यमिक शाळेपर्यंत झाले होते; पण ‘ते अशिक्षित होते’ असे कुणीही म्हणणार नाही. त्यांच्याकडे कायद्याची पदवी नसली, तरी कायद्याचा अभ्यास करण्याची त्यांची पात्रता होती. शिक्षण अल्प असतांनाही ते राष्ट्रपिता झाले. त्यामुळे ‘केवळ पदवी घेणे म्हणजे शिक्षण घेणे’, असे होत नाही, असा दावा जम्मू-काश्मीरचे उपराज्यपाल मनोज सिन्हा यांनी येथे आय.टी.एम्. विद्यापिठात डॉ. राम मनोहर लोहिया यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ आयोजित व्याख्यानमालेत बोलतांना केला. मनोज सिन्हा हे विद्यार्थ्यांना, ‘केवळ पदवी मिळवणे म्हणजे शिक्षण मिळवणे नाही’, हे समजवण्याच प्रयत्न करत होते.

उपराज्यपाल मनोज सिन्हा यांच्या या विधानावर काँग्रेसने आक्षेप घेतला आहे. मध्यप्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष कमलनाथ यांचे माध्यम सल्लागार पीयूष बबेले यांनी ‘जेव्हापासून पंतप्रधान मोदी आणि केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांच्या पदवीवर प्रश्‍न उपस्थित करण्यात येतोय, तेव्हापासून भाजपसमोर मोठा पेच निर्माण झाला आहे. म. गांधी हे बॅरिस्टर होते. तुमच्या वादात त्यांना का ओढत आहत ?’, असे म्हटले.