पाकव्याप्त काश्मीरमधील विद्यार्थिनी आणि शिक्षिका यांना हिजाब अपरिहार्य !

(हिजाब म्हणजे मुसलमान महिलांनी डोक आणि मान झाकण्यासाठी वापरलेले वस्त्र)

पाकव्याप्त काश्मीरमधील पत्रकारांकडून विरोध

इस्लामाबाद – पाकव्याप्त काश्मीरमध्ये पाकिस्तान शिक्षण विभागाने आदेश काढूद शाळांमध्ये विद्यार्थिनी आणि शिक्षिका यांना हिजाब वापरणे अनिवार्य केले आहे. ‘ग्लोबल सिटिझन्स’या स्वयंसेवी संस्थेच्या म्हणण्यानुसार, ‘या निर्णयामुळे मागास क्षेत्रातील मुलींच्या शिक्षणावर आणखी वाईट परिणाम होईल.’ ‘हिजाब परिधान करून न येणार्‍या विद्यार्थिनी आणि शिक्षिका यांच्यावर कारवाई करण्यात येईल’, असे प्रशासनाने म्हटले आहे. या निर्णयाला पाकव्याप्त काश्मीरमधील पत्रकार अन् सामाजिक कार्यकर्ते यांनी विरोध केला आहे.

१. ‘पाकिस्तानला पाकव्याप्त काश्मीरची ओळख मिटवायची आहे, त्यासाठी त्याचे इस्लामीकरण करण्याचा प्रयत्न पाक सरकारकडून चालू आहे. याचाच एक भाग म्हणून शाळांमध्ये विद्यार्थिनी आणि शिक्षिका यांना हिजाब घालणे अपरिहार्य केले जात आहे’, असे काही सामाजिक कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे.

२. ‘पाकव्याप्त काश्मीरची वांशिक आणि भाषिक ओळख पुसण्यासाठी प्रयत्न केले जात असून ते रोखण्यासाठी याला स्थानिक लोकांनी प्रखर विरोध करणे आवश्यक आहे’, असे स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे.

३. एका प्रसारमाध्यमाच्या वृत्तानुसार, १ मार्चपासून पाकिस्तानात पहिली डिजिटल जनगणना चालू झाली आहे. यापूर्वी पाक सरकारकडून पाकव्याप्त काश्मीरमधील लोकांना ‘डिजिटल’ ओळखपत्र देण्यात आले होते. या ओळखपत्रामध्ये पाकव्याप्त काश्मीरमधील लोकांना ‘जम्मू-काश्मीरचे माजी नागरिक’ अशी ओळख देण्यात आली होती. ही ओळख आता पुसण्यात आली आहे.

४. पूर्वी जनगणनेच्या कागदपत्रांमध्ये स्थानिक भाषांविषयी रकाना होता. तो रकाना आता काढून टाकण्यात आला आहे. पाकव्याप्त काश्मिरी लोकांची स्वतंत्र ओळख पुसण्यासाठी पाक सरकारकडून या कारवाया करण्यात येत आहेत.