गोव्यात वनक्षेत्रांना आग लागल्याच्या घटना
पणजी, २१ मार्च (वार्ता.) – सह्याद्रीतील म्हादई अभयारण्य, तसेच राज्यातील अन्य वनक्षेत्र यांमध्ये ५ ते १४ मार्च या कालावधीत आगीच्या एकूण सुमारे ७२ घटना घडल्या आहेत. म्हादई अभयारण्यात साट्रे येथे लागलेली आग पुढे अभयारण्यातील अन्य भाग आणि जवळच्या परिसरात पसरून सहस्रो वर्षांची जैवविविधता काही क्षणांत भक्ष्यस्थानी पडली. नौदल, वायूदल, अग्नीशमन, वन खाते आणि स्थानिक नागरिक यांनी मोठ्या प्रमाणात केलेल्या साहाय्यामुळे अखेर आग आटोक्यात येऊ शकली. यावर पर्यावरणतज्ञ प्रा. राजेंद्र केरकर म्हणाले, ‘‘नष्ट झालेले वन पुन्हा पूर्वीप्रमाणे बहरण्यासाठी ५० हून अधिक वर्षांचा कालावधी लागणार आहे.’’
अभयारण्यातील व्याघ्रक्षेत्र जळून खाक !
प्रा. राजेंद्र केरकर पुढे म्हणाले, ‘‘म्हादई अभयारण्यात ज्या भागांमध्ये आग लागली होती, त्या भागांचा आम्ही नकाशा सिद्ध केल्यास लक्षात येईल की, ज्या भागांमध्ये वाघांचे अस्तित्व होते, तो भाग आगीच्या भक्ष्यस्थानी पडला आहे. हेतूपुरस्सर कुणीतरी आग लावली असावी, असा संशय घेण्यास वाव आहे. वाघाचा वावर असलेला भाग पूर्णपणे उद्ध्वस्त करण्यात आला आहे. मी वन खात्याला व्याघ्रक्षेत्र असलेल्या भागांमध्ये ‘कॅमेरा ट्रॅप’ बसवण्याची विनंती केली होती, ती खात्याने फेटाळली. आगीमुळे वाघाचा अधिवास पूर्णपणे असुरक्षित झाला आहे. वाघाचे अन्न असलेले हरीण आदी प्राणीही आता येथे दुर्मिळ होणार आहेत; कारण हरीण आदी प्राण्यांसाठी लागणारे गवत आगीत भस्मसात झाले आहे. ‘आग दुर्घटनांमध्ये जैवविविधता किंवा काही मोठ्या झाडांची हानी झालेली नाही’, असे जे म्हटले जाते ते पूर्णपणे खोटे आहे.
वनक्षेत्रांतील जैविक वनसंपदा पूर्णपणे नष्ट झालेली आहे आणि ती पुन्हा निर्माण होणे ही काही सोपी गोष्ट नाही. काही जण म्हणतात, ‘‘कुमेरी शेतीच्या वेळी भूमी किंवा रान यांना आग लावत होतो आणि पुन्हा ‘कुमेरी’ शेतीच्या माध्यमातून हिरवेगार जंगल निर्माण करत होतो.’’ ही गोष्ट पूर्णपणे खोटी आहे. आगीमध्ये नष्ट झालेली मोठी झाडे पुन्हा निर्माण होण्यासाठी सुमारे ६० ते ७० वर्षांचा कालावधी लागणार आहे. नष्ट झालेली ‘कार्वी’सारखी झाडे पुढील वर्षी पुन्हा नव्याने उगवणार; मात्र ती पूर्वीप्रमाणे बहरण्यासाठी त्यांना ७ वर्षांचा कालावधी लागणार आहे. अभयारण्यातील पक्षांचे अस्तित्व नष्ट होण्याच्या मार्गावर आहे.
मातीची धूप झाल्याने पावसात पूर येण्याची दाट शक्यता ! – पर्यावरणतज्ञ सूर्यकांत गावकर
आग लागण्यापूर्वी म्हादई अभयारण्यात हिरवेगार जंगल होते आणि बाबूंच्या झाडांमधून वाट काढून पुढे जावे लागत होते; मात्र आता बांबूची झाडे, तसेच अन्य लहानसहान झाडे जळून नष्ट झालेली आहेत. या जंगलात जंगली जायफळाची झाडे पुष्कळ प्रमाणात होती आणि आता ती पूर्णपणे नष्ट झालेली आहेत. मातीची धूप झालेली आहे आणि पुढील पावसात ही माती वाहून नदीत जाणार आहे आणि यामुळे आगामी काळात आम्हाला पुराला सामोरे जावे लागेल, यामध्ये कोणतेच दुमत नाही. वनक्षेत्रात जळलेल्या झाडांची मुळे आहेत आणि त्या ठिकाणी पावसाचे पाणी जिरून भूस्सखलन होण्याची शक्यता आहे, अशी माहिती पर्यावरणतज्ञ सूर्यकांत गावकर यांनी प्रसारमाध्यमांना दिली.
सत्तरीत काजूची २ सहस्र कलमे जळून खाक
वाळपई, २१ मार्च (वार्ता.) – अडवई, सत्तरी येथील घनश्याम देसाई आणि मधुकर देसाई यांच्या काजूच्या बागायतीला २१ मार्च या दिवशी आग लागली आहे. यामध्ये काजूची अंदाजे २ सहस्र कलमे, आंब्याची झाडे आणि इतर पिके जळून खाक झाली आहेत. ही आग कुणीतरी हेतूपुरस्सर लावल्याची शक्यता दोन्ही बागायतदारांकडून व्यक्त करण्यात येत आहे. ऐन पीक येण्याच्या वेळी काजू पीक जळून खाक झाल्याने बागायतदार संकटात सापडले आहेत. वाळपई अग्नीशमन दल आग विझवण्याचे काम करत आहेत.
अभयारण्यात लोकांना प्रवेश न देण्याचा वनमंत्री विश्वजीत राणे यांचा सक्त आदेश
वनमंत्री विश्वजीत राणे यांनी राज्यातील उपवनपाल यांना अभयारण्यात लोकांना प्रवेश न देण्याचा सक्त आदेश दिला आहे. वनमंत्री विश्वजीत राणे म्हणाले, ‘‘वनक्षेत्रातील आग दुर्घटना ही मानवनिर्मित असल्याचे प्राथमिकदृष्ट्या वाटते आणि या घटनांचे सखोल अन्वेषण करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. या उत्तरदायी असलेल्यांवर कारवाई करण्यात येणार आहे. अभयारण्यात प्रवेश करणारे किंवा अभयारण्यात प्रवेश करून आग लावणार्यांना वन कायद्यानुसार कह्यात घेतले जाणार आहे. वनक्षेत्रात आग लागल्यास संबंधित साहाय्यक वनपालांना उत्तरदायी ठरवले जाणार आहे.’’