सध्या चीनची लोकसंख्या वृद्ध होत आहे. त्याचे चीन आणि त्यांची अर्थव्यवस्था यांवर काय परिणाम होणार आहेत, याविषयीचे विश्लेषण या लेखात पाहूया.
१. चीनच्या लोकसंख्येत वृद्धांची झपाट्याने वाढ
‘२०२२ या वर्षी चीनमध्ये गेल्या ६० वर्षांतील सर्वांत अल्प लोकसंख्या नोंदवली गेली आहे. मागील वर्षी चीनचा राष्ट्रीय जन्मदर कमालीचा घटल्याचे दिसून आले आहे. या घसरत्या जन्मदरामुळे चीनची लोकसंख्या झपाट्याने वृद्ध होत असल्याचे एका सर्वेक्षणातून पुढे आले आहे. वर्ष २०२१ मध्ये चीनची लोकसंख्या १४१ कोटी २६ लाख होती. वर्ष २०२२ मध्ये ही लोकसंख्या घटून १४१ कोटी १८ लाखांवर आली. सद्यःस्थितीत चीनमधील ज्येष्ठांची संख्या २७ कोटी आहे, म्हणजे तेथे १९ टक्के ज्येष्ठ नागरिक (६५ वर्षांहून अधिक) आहेत. वर्ष २०५० पर्यंत ही संख्या ५५ कोटीपर्यंत जाण्याची शक्यता चीनच्या ‘नॅशनल वर्किंग कमिशन’ने (राष्ट्रीय कार्य समितीने) वर्तवली आहे.
आर्थिक दृष्टीकोनातून विचार केल्यास कुठल्याही देशासाठी वृद्धांची संख्या वाढत रहाणे, हे अर्थव्यवस्थेसाठी धोकादायक ठरू शकते. वृद्ध हे तरुणांएवढे काम करू शकत नाहीत. त्यामुळे त्या देशाची प्रगती फार अल्प होते, असे समजले जाते. बिघडलेली अर्थव्यवस्था परत योग्य मार्गावर आणायची असेल, तर चीनला जन्मदर वाढवावा लागेल की, जे होणे शक्य नाही. त्यामुळे चीनच्या अर्थव्यवस्थेला गंभीर परिणाम भोगावे लागणार आहेत. अशी चिन्हे आतापासूनच दिसू लागली आहेत.
२. वृद्धांच्या वाढीमुळे चीनच्या अर्थव्यवस्थेवर मोठा परिणाम
देशात वृद्धांची लोकसंख्या वाढल्याने अर्थव्यवस्थेवर मोठा ताण पडतो. वृद्ध हे तरुणांएवढे सक्षम नसतात. त्यांची काम करण्याची क्षमता न्यून होते आणि देशावर अनेक प्रकारचे आघात होतात. चीनला काम करण्यासाठी पुरेसे तरुण मिळत नाहीत. यावर उपाय म्हणून चीनने निवृत्तीचे वय पुरुषांसाठी ६०, तर महिलांसाठी ५५ वर्षे ठेवले आहे. एवढे करूनही काही परिणाम झाला नाही. वृद्धांमुळे तेथे वैद्यकीय सुविधांची आवश्यकता फारच वाढली आहे. त्यांच्या आरोग्य सेवांवर मोठा भार पडत असून त्याचा व्यय वाढत आहे. लोकांची उत्पादक क्षमता अल्प होत आहे; कारण अन्य कुटुंबियांना त्यांच्या वृद्ध लोकांची काळजी घ्यावी लागते. वृद्ध त्यांच्या वयानुसार अल्प बचत करून व्यय अधिक करतात. त्यामुळे चीनचा बचत दर अल्प झाला असून वित्तपुरवठा घटला आहे. त्यामुळे भविष्यात करावयाची गुंतवणूक अल्प होत आहे.
३. वृद्ध लोकसंख्या वाढीचा वैचारिक पातळीवरील परिणाम
देशातील वृद्धांच्या वाढत्या संख्येमुळे देशाच्या वैचारिक प्रगतीवरही परिणाम होतो. वृद्ध माणसांकडे नवीन कल्पना नसतात. त्यामुळे नवे विचार आणि नव्या कल्पना यांना वाव मिळत नाही. त्यांना नवीन तंत्रज्ञानाचा वापरही करता येत नाही. त्यामुळे जागतिक पातळीवर तंत्रज्ञानाच्या संदर्भात आपला देश कुठेतरी अल्प पडेल, अशी भीती चीनला वाटत आहे.
४. लोकसंख्या वाढीसाठी चीनचे प्रयत्न
काही वर्षांपूर्वी चीनने ‘एक मूल’ हे धोरण राबवले होते. त्यानुसार कुठल्याही जोडप्याला एकच मूल जन्माला घालण्याचे बंधन होते. त्यामुळे लोकसंख्येचे प्रमाण व्यस्त झाले आहे. १२० मुलांच्या मागे केवळ १०० मुली मिळत आहेत. शहरात जन्मदर घटत चालला आहे. अनेक जोडप्यांना मुले नकोच आहेत. त्यांचे केवळ त्यांच्या कामावर लक्ष आहे. त्यामुळे चीनचा जन्मदर वाढण्यात अडचण येत आहे. चीनमधील तरुणांची संख्या न्यून झाल्याने त्याचा परिणाम थेट देशाच्या अर्थव्यवस्थेला बसणार आहे. त्यासाठी चीन सरकार सातत्याने नवीन योजना राबवून जन्मदर वाढवण्याचा प्रयत्न करतांना दिसत आहे.
चीनने जन्मदरात होणारी घसरण थांबवण्यासाठी प्रत्येकी ३ मुले जन्माला घालण्याचे धोरण आखले आहे. बीजिंग, सिचुआन आणि जियांगशी या प्रांतामध्ये आई-वडिलांना अधिक सुट्ट्या देणे, मातृत्व आणि पितृत्व रजा, विवाहासाठी सुट्टी, अशा विविध सुविधा दिल्या जात आहेत. एवढे सगळे करूनही विस्कटलेली लिंग गुणोत्तराची घडी आणि मूल जन्माला येऊ न देणे यांसारखे विचार रुजल्याने चीनच्या या प्रयत्नांना यश मिळतांना दिसत नाही. याला पर्याय म्हणून चीन ज्या ठिकाणी माणसांची संख्या अल्प पडत आहे, तेथे ‘रोबोट्स’सारख्या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत आहे.
तेथील वृद्ध किंवा ज्येष्ठ नागरिक यांना नवीन तंत्रज्ञानाची विशेष माहिती नाही. त्यामुळे चीन त्यांना नवीन तंत्रज्ञान शिकवण्याचा प्रयत्न करत आहे. जेणेकरून त्यांची क्षमता वाढू शकेल; परंतु दुर्दैवाने ज्येष्ठ नागरिक नवीन तंत्रज्ञानही शिकायला सिद्ध नाहीत. एकंदर चीनने वर्ष १९६० पासून लोकसंख्येविषयी जे कठोर धोरण आखले, ते त्याला चांगलेच महागात पडले आहे.
५. चीनच्या समस्येतून भारताने बोध घेणे आवश्यक !
भारताने चीनकडून शिकायला पाहिजे. सध्या भारताला ‘तरुणांचा देश’ म्हटले जात असले, तरी येणार्या काळात भारतीय ज्येष्ठांचीही संख्या वाढणार आहे. त्यामुळे भारतानेही आतापासून विशेष धोरण राबवणे आवश्यक आहे. त्यांच्या मुलांना त्यांची काळजी घेण्यास शिकवले पाहिजे. चीनमध्ये ज्या समस्या निर्माण होत आहेत, त्यातून शिकून पुढे गेले पाहिजे.’
– (निवृत्त) ब्रिगेडियर हेमंत महाजन, पुणे.