नवी मुंबई महापालिका भटक्या मांजरांचीही करणार नसबंदी

स्तुत्य निर्णय !

तुर्भे – शासनाच्या आदेशानुसार महापालिकेच्या वतीने शहरातील भटक्या मांजरांची नसबंदी केली जाणार आहे, अशी माहिती पशू वैद्यकीय अधिकारी तथा उपायुक्त श्रीराम पवार यांनी दिली. महापालिकेच्या श्वान निर्बिजीकरण केंद्राच्या लगत नसबंदी करण्याची यंत्रणा उभारण्यात येणार आहे.

गावासह शहरातील घराघरांमध्ये मांजरी पाळल्या जातात. मांजरी पाळण्याची रूढी पडल्यामुळे विशेषतः झोपडपट्टी आणि अल्प उत्पन्न गट येथील वसाहतीत मांजरी पाळण्याचे प्रकार वाढले आहेत. काही मासातच या मांजरीना पिल्ले होतात; मात्र एका घरात एखादे पिल्लू ठेवून बाकीची अन्य ठिकाणी सोडून दिली जातात. परिणामी भटक्या मांजरांची संख्या पुष्कळ प्रमाणात वाढली आहे. ही मांजरे दुचाकीच्या ‘सीट’च्या कव्हरवर नखे मारून ते फाडणे, गाड्यांवर किंवा परिसरात कुठेही घाण करणे अशा विविध प्रकारे उच्छाद मांडतात. मांजरी आणि बोके यांच्या भांडणामुळे आणि आवाजामुळे रात्री अपरात्री रहिवाशांची झोपमोड होत आहे. या भटक्या मांजरांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. त्यामुळे आता याचा त्रास रहिवाशांना होऊ लागला आहे. याची नोंद घेऊन शासनाने मांजरीची नसबंदी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार सर्व महानगरपालिकांना त्यांच्या हद्दीतील मांजरीची नसबंदी करण्याची यंत्रणा उभारण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

संपादकीय भूमिका

सर्व महापालिकांनी असा निर्णय घेण्याविषयी विचार करावा; परंतु भटक्या श्वानांची नसबंदी करण्याची व्यवस्थित प्रक्रिया होत आहे किंवा नाही, याविषयी महापालिकेच्या पशू वैद्यकीय अधिर्‍यांनी सांगितले पाहिजे !