उत्तर प्रदेश : चैत्र नवरात्रीला प्रत्येक जिल्ह्यात दुर्गा सप्तशतीचे पठण होणार !

  • उत्तरप्रदेश शासनाचा अभिनंदनीय निर्देश !

  • अखंड रामायणाचेही पठण होणार !

  • प्रत्येक जिल्ह्यासाठी १ लाख रुपयांची तरतूद !

लक्ष्मणपुरी (उत्तरप्रदेश) – उत्तरप्रदेश शासनाने सर्व जिल्ह्यांचे विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकारी यांना मार्गदर्शक तत्त्वे लागू केली असून त्यांना चैत्र नवरात्र उत्सव उत्साहात साजरा करण्यास सांगितला आहे. सरकारने सर्व जिल्ह्यांतील सर्व देवीची मंदिरे आणि शक्तीपीठे यांमध्ये चैत्र नवरात्रीला दुर्गा सप्तशतीचे पठण अन् देवीचे जागरण आयोजित करण्याचे निर्देश दिले आहेत. यासमवेतच अखंड रामायण पठणाचे आयोजन करण्यासही सांगितले आहे. यासाठी उत्तरप्रदेशच्या योगी आदित्यनाथ शासनाकडून प्रत्येक जिल्ह्यासाठी १ लाख रुपयांचा निधीही दिला जाणार आहे.

(सौजन्य : Zee News)

१. २२ मार्च ते ३१ मार्च या कालावधीत चालणार्‍या चैत्र नवरात्रीची सिद्धता २१ मार्चपर्यंत पूर्ण करण्यास सर्व अधिकार्‍यांना सांगण्यात आले आहे.

२. सर्व कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी उत्तरप्रदेश सरकारने प्रत्येक तालुका आणि जिल्हा येथे समित्या स्थापन करण्याचा आदेश देण्यात आला आहे. तसेच अन्य दोन अधिकार्‍यांची नियुक्ती केली आहे. यासमवेतच महिला आणि मुली यांच्या सहभागावर भर देण्यात आला आहे.


उत्तरप्रदेश शासनाने सर्व जिल्ह्यांचे विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकारी यांना लागू केलेली मार्गदर्शक तत्त्वे पाहण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा
https://www.shasnadesh.com/2023/03/22-30-2023.html


३. मंदिरांमध्ये आयोजित केलेल्या सर्व कार्यक्रमांची छायाचित्रे सांस्कृतिक विभागाच्या  संकेतस्थळावर प्रसारित केली जाणार आहेत.

४. जिल्हा दंडाधिकार्‍यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात येणार असून ही समिती पठणामध्ये सहभागी होणार्‍यांची निवड करणार आहे.

योगी शासनाने विधानसभेत भगवान श्रीरामाची मूर्ती बसवावी ! – काँग्रेस

योगी शासनाच्या निर्णयाचे काँग्रेसचे नेते आचार्य प्रमोद कृष्णम्् यांनी स्वागत केले आहे.  योगी आदित्यनाथ हे केवळ राज्याचे मुख्यमंत्री नाहीत, तर मठाचे मठाधीशही आहेत. त्यामुळे नवरात्रीत ठिकठिकाणी जागरण आणि कीर्तने व्हायला हवीत.

प्रभु श्रीरामाची मूर्ती विधानसभेत आणि प्रत्येक जिल्हाधिकार्‍यांच्या कार्यालयात बसवली पाहिजे. प्रत्येक जिल्हाधिकारी कार्यालयात रामचरितमानसाचे पठण झाले पाहिजे, तरच ते हिंदु राष्ट्र दिसेल, असे आचार्य प्रमोद कृष्णम् म्हणाले.