नागपूर येथे भिकार्‍यांविरुद्ध जमावबंदी आदेश लागू !

  • ‘जी-२०’ परिषदेतील पाहुण्यांना दारिद्र्य न दिसण्यासाठी पोलिसांचा आटोकाट प्रयत्न !

  • १५० भिकार्‍यांना त्यांच्या घरी सोडले !

नागपूर – येथे २० ते २२ मार्च या कालावधीत नागपूर ‘जी-२०’ अंतर्गत ‘सी-२०’ परिषद होत आहे. या निमित्ताने पाहुण्यांचा प्रवास असलेला भाग स्वच्छ केला जात आहे. संपूर्ण मार्ग, तसेच परिसर यांचे सौंदर्यीकरण आणि सुशोभीकरण केले जात आहे. विदेशी झाडे लावली जात आहे. शहरातील दारिद्र्य पाहुण्यांसमोर उघड होऊ नये, यासाठी पोलीस आयुक्तांनी भिकार्‍यांविरुद्ध जमावबंदी आदेश लागू केला आहे.

पोलीस पकडतील; म्हणून अनेक भिकार्‍यांनी मूळ गावी पोबारा केला आहे. जमावबंदी आदेश लागू होताच पहिली कारवाई यशवंत स्टेडियम परिसरात करण्यात आली. धंतोली पोलिसांनी परिसरातील १५० भिकार्‍यांना कह्यात घेऊन त्यांच्या मूळ गावी सोडले. यात ३० मुले, ४० महिला आणि ८० पुरुष यांचा समावेश आहे.
‘सी-२०’ परिषदेनिमित्त येणार्‍या पाहुण्यांच्या स्वागताची विशेष सिद्धता केली जात आहे. विमानतळ परिसर विविध प्रकारे सजवला जात आहे.