पुन्हा मंदीचे सावट ?

सिलिकॉन व्हॅली बँक दिवाळखोरीत

अमेरिकेतील ‘सिलिकॉन व्हॅली बँक’ दिवाळखोरीत निघाल्यामुळे पुन्हा एकदा आंतरराष्ट्रीय बाजारात खळबळ उडाली आहे. त्यामुळे भारतीय शेअर बाजारात मोठ्या प्रमाणात घसरण झाली आहे. सिलिकॉन व्हॅली ही अमेरिकेतील १६ मोठ्या बँकांपैकी एक आहे. ही बँक माहिती-तंत्रज्ञान, आरोग्यविषयक आणि अन्य उदयोन्मुख नवीन आस्थापने यांना कर्ज देते. त्यामुळे या बँकेकडे पैशांची मोठ्या प्रमाणावर उलाढाल होत होती. या बँकेचे मूळ आस्थापन ‘एस्.व्ही.बी. फायनान्शिअल ग्रुप’चे शेअर्स ८५ टक्क्यांनी घसरले. त्यानंतर ही बँक बंद करण्यात आली. बँक बंद करण्याच्या घोषणेमुळे जगभरातील उलाढालींवर परिणाम झाला असून पुन्हा मंदी येण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे.

‘सिलिकॉन व्हॅली’ या बँकेची संपत्ती २०९ अब्ज डॉलर्स (१७ सहस्र १३० कोटी रुपयांहून अधिक) आहे. या बँकेच्या अमेरिकेच्या अनेक शहरांमध्ये शाखा पसरल्या आहेत. बँकेने स्वत:कडील पैशांतून रोखे (बाँड) खरेदी केले; मात्र व्याजदर अल्प असल्यामुळे या गुंतवणुकीवर चांगला परतावा मिळाला नाही. अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्हने माहिती-तंत्रज्ञान क्षेत्रातील आस्थापनांच्या व्याजदरात सातत्याने वाढ केली आहे. परिणामी आस्थापनांनी व्यवसायासाठी पैसे हवे असल्यामुळे बँकेतून पैसे काढले. वाढत्या व्याजदरामुळे माहिती-तंत्रज्ञान क्षेत्रातील गुंतवणूक अल्प झाली. वारंवार पैसे काढल्यामुळे बँकेला मालमत्ता विकावी लागली आहे. बँकेच्या मोठ्या कर्जदारांना कर्जफेड करणे कठीण होऊन बसले. बँकेच्या या स्थितीमुळे गुंतवणूकदारांवरही परिणाम झाला. बँकेने शेअर्स विकण्यास काढले असून जगातील सर्वांत श्रीमंत व्यक्ती इलॉन मस्क यांनी ट्वीट करत ही बँक विकत घेण्याची सिद्धता दर्शवली आहे.

अमेरिकेतील आस्थापनांची विश्वासार्हता ?

जानेवारी मासात अमेरिकेतील संशोधन आस्थापन ‘हिंडनबर्ग’ने भारतातील अग्रणी उद्योगपती आणि जगात तेव्हा क्रमांक २ ला पोचलेले कोट्यधीश गौतम अदानी यांच्या आस्थापनांविरुद्ध नकारात्मक अहवाल सिद्ध केला. कोणत्याही आस्थापनात होणारी आर्थिक गडबड शोधून तिचा विस्तृत अहवाल सिद्ध करून प्रकाशित करण्याचे काम ‘हिंडनबर्ग’ करते. हिंडनबर्गचा अहवाल प्रसिद्ध झाल्यानंतर गौतम अदानी यांच्या आस्थापनाचे शेअर्स बाजारात मोठ्या प्रमाणावर कोसळले. त्यामुळे अदानींची जगात अपकीर्ती झाली आणि त्यांना काही कोट्यवधी रुपयांचा तोटा सहन करावा लागला. जे आस्थापन जगाच्या पाठीवर नुकत्याच चमकलेल्या अदानींच्या मागे लागते, ते स्वत:च्या देशातील एवढ्या मोठ्या बँकेतील गैरव्यवहारांकडे का दुर्लक्ष करते ? त्यांना भारतातील पुढे येणार्‍या आस्थापनांवर लक्ष ठेवण्यास वेळ आहे; मात्र स्वत:च्या देशातील बुडणार्‍या बँकांचे गैरप्रकार दिसत नाहीत ? कि त्याकडे जाणूनबुजून दुर्लक्ष करतात ? हे पहाणे महत्त्वाचे आहे. यातून या अमेरिकी

शोध (?) संस्था, आस्थापने यांची विश्वासार्हता किती आहे ? हे लक्षात येते.

सिलिकॉन व्हॅली बँकेला अगदी काही दिवसांपूर्वीच वर्ष २०२३ मधील ‘अमेरिकेतील सर्वाेत्तम बँक’ म्हणून ‘फोर्ब्ज’ या जगप्रसिद्ध नियतकालिकाने सन्मानित केले होते. आता बँक दिवाळखोरीत निघाल्याने या सन्मानाचे तीन तेरा वाजले आहेत. अमेरिकेतील आस्थापने एकमेकांची कशी आंधळेपणाने प्रशंसा करतात ? आणि स्वत:च्या पायावर धोंडा कसा मारून घेतात, हे यातून लक्षात येते. हीच आस्थापने भारतात नावारूपाला येणार्‍यांवर मात्र ताशेरे ओढतात, खोटे अहवाल बनवतात, भारतात अल्पसंख्यांकांवर अन्याय आणि अत्याचार होत असल्याच्या खोट्या कथा प्रसारित करतात. जेणेकरून भारतासारख्या विकसनशील देशाने अमेरिकेच्या पुढे जाऊ नये.

वर्ष २००८ ची पुनरावृत्ती !

वर्ष २००८ मध्ये अमेरिकेतील ‘लेहमन ब्रदर्स’ या बँकिंग उद्योगाने दिवाळखोरी घोषित केली होती. तेव्हा केवळ अमेरिकाच नाही, तर संपूर्ण जगच मंदीच्या संकटात सापडले होते. वर्ष २००१ ते २००६ या काळात अमेरिकन ‘रिअल इस्टेट’ आस्थापनांना तेथील बँकांकडून मोठी कर्जे देण्यात आली होती. कर्जाचे पैसे परत कसे येतील ? याचा काही विचार बँकांकडून झाला नाही. तेव्हा अमेरिकी ‘रिअल इस्टेट’ बाजारपेठ शिखरावर होती. जेव्हा या क्षेत्रात मंदीची परिस्थिती आली, तेव्हा बँकांच्या अडचणी वाढल्या अन् बँकांची कर्जे बुडाल्याने त्यात ‘लेहमन ब्रदर्स’ ही बँक बुडाली. तेव्हाही अमेरिकेसह जगाला मोठा धक्का बसला होता.

आत्मनिर्भर होणे आवश्यकच !

अमेरिकेला जगातील सर्वांत श्रीमंत आणि समृद्ध देश असे मानले जाते. अमेरिकेची, तेथील उद्योगांची वाहवा करण्यात येते. तेथील उद्योग, बँका यांवर जग अजूनही पुष्कळ अवलंबून आहे. परिणामी तेथील व्यवस्था, पद्धती यांचे अनुकरण करण्याचा प्रयत्न केला जातो. तेच जेव्हा कोसळतात, त्यांच्यावर जेव्हा संकट येते, तेव्हा भारतासह जगभरात गोंधळ निर्माण होतो. जगाने कसा व्यवहार करावा ? हे अमेरिका ठरवण्याचा प्रयत्न करते. दुसर्‍या भाषेत अमेरिका जग नियंत्रित करण्याचा प्रयत्न करते. परिणामी अमेरिकेच्या तालावर भारताला नाचावे लागले आहे. अमेरिकेचे अंधानुकरण करण्याची काँग्रेसची परंपरा राहिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी सत्तेवर आल्यापासून आणि त्यांनी ‘आत्मनिर्भर भारता’चा नारा दिल्यामुळे देश काही प्रमाणात सावध आहे. भारताने अमेरिकेवर किती अवलंबून रहायचे ? हे ठरवण्याची वेळ आता आली आहे. भारताकडे विपुल साधन-संपत्ती आणि नैसर्गिक संसाधने आहेत. त्यामुळे भारताने स्वतंत्र धोरण आणि धर्माधारित विकासाचे नियोजन करून त्यावर मार्गक्रमण चालू ठेवावे. एक ना एक दिवस भारत पुन्हा त्याचे जगातील क्रमांक १ चे स्थान मिळवूनच दाखवेल, हे निश्चित !