उद्योजक सदानंद कदम यांना १५ मार्चपर्यंत ‘ईडी’ची कोठडी !

दापोली येथील वादग्रस्त ‘साई रिसॉर्ट’ प्रकरण

मुंबई – दापोली येथील ‘साई रिसॉर्ट’ प्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाने (‘ईडी’ने) ठाकरे गटाचे अधिवक्ता अनिल परब यांचे व्यावसायिक भागीदार उद्योजक सदानंद कदम यांना १० मार्च या दिवशी कह्यात घेतले होते. न्यायालयाने त्यांना
१५ मार्चपर्यंत ‘ईडी’ची कोठडी सुनावली आहे.

‘ईडी’ने सादर केलेल्या पुराव्यात अनिल परब यांच्या खात्यातून १ कोटी रुपये विभास साठे यांना दिले गेल्याचे उघड झाले आहे. सदानंद कदम यांच्या माध्यमातून ही रक्कम दिल्याचे ‘ईडी’ने म्हटले आहे. ‘ईडी’चा युक्तीवाद न्यायालयाने मान्य केला. ईडीच्या अधिवक्त्यांनी १४ दिवसांच्या कोठडीची मागणी केली होती; मात्र न्यायालयाने ती फेटाळून लावत १५ मार्चपर्यंत कोठडी दिली.

न्यायालयात युक्तीवाद करतांना ‘ईडी’चे अधिवक्ते म्हणाले की, अनिल परब यांच्या सांगण्यावरून सदानंद कदम यांनी विभास साठे यांच्याशी ८० लाख रुपयांचा व्यवहार केला. ५४ लाख रुपयांत ‘साई रिसॉर्ट’ची बांधणी करण्यात आली; मात्र अधिकृतपणे त्याची किंमत साडेतीन कोटी रुपये दाखवण्यात आली आहे. त्यामुळे हे पैसे नेमके कुठून आले ? याचे अन्वेषण आम्हाला करायचे आहे.

कदम यांचे अधिवक्ता नरंजन मुदरगी यांनी सांगितले की, सदानंद कदम यांना कोठडीत असतांना औषध घेण्याची अनुमती देण्यात आली आहे; मात्र त्यांना घरचे जेवण देण्यास ‘ईडी’ने विरोध केला आहे.