|
पुणे, ८ मार्च (वार्ता.) – ‘अमूल्य ज्योती’ आणि ‘केशव वेणू प्रतिष्ठान’ यांच्या संयुक्त विद्यमाने सुप्रसिद्ध बासरीवादक पू. पं. डॉ. केशव गिंडे यांचा सहस्रचंद्रदर्शनाचा कार्यक्रम ५ मार्च या दिवशी आयोजित करण्यात आला होता. या प्रसंगी करवीरपीठाचे जगद़्गुरु शंकराचार्य प.प. श्री विद्यानृसिंह भारती स्वामी यांची वंदनीय उपस्थिती लाभली. या वेळी पू. पं. डॉ. गिंडे यांचे सुवासिनींनी औक्षण केले आणि करवीरपीठाच्या ब्रह्मवृंदाने आशीर्वचनपर मंत्रपठण केले. तसेच पू. पं. डॉ. गिंडेे यांच्या जीवनपटावर आधारित चित्रफीतही दाखवण्यात आली. या कार्यक्रमात महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाच्या वतीने पू. पं. डॉ. केशव गिंडे यांचा श्रीकृष्णाची प्रतिमा, शाल, श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला. या वेळी महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाचे संस्थापक सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत बाळाजी आठवले यांनी दिलेल्या शुभेच्छा संदेशाचे वाचन करण्यात आले.
पू. पं. डॉ. केशव गिंडे यांची कलेसोबतच आध्यात्मिक बैठकही उच्च कोटीची ! – जगद़्गुरु शंकराचार्य प.प. श्री विद्यानृसिंह भारती स्वामीपू. पं. डॉ. केशव गिंडे यांचे व्यक्तिमत्त्व अतिशय सात्त्विक आहे. त्यांनी संपूर्ण आयुष्य अतिशय साध्या आणि सात्त्विकतेने व्यतीत केले आहे. कलेसोबतच त्यांची आध्यात्मिक बैठकही उच्च कोटीची आहे. आजकालच्या काळात अशी माणसे दुर्मिळ आहेत. म्हणूनच त्यांनी विनंती करताच मी या कार्यक्रमाला उपस्थित रहाण्यास होकार दिला. त्यांना दीर्घायुष्य लाभो. कला आणि अध्यात्म यात त्यांची उत्तरोत्तर प्रगती होवो, अशी प्रार्थना करतो. |
करवीरपीठाचे जगद़्गुरु माझ्या सहस्रचंद्रदर्शन सोहळ्यासाठी उपस्थित असणे, हा माझ्या जीवनातील सर्वांत मोठा आनंदाचा क्षण ! – पू. पं. डॉ. केशव गिंडे
करवीरपीठाचे जगद़्गुरु शंकराचार्य माझ्या सहस्रचंद्रदर्शन सोहळ्यासाठी उपस्थित आहेत, हा माझ्या जीवनातील सर्वांत मोठा आनंदाचा क्षण आहे. माझा परिवार, सर्व शिष्यमंडळी, ‘अमूल्य ज्योती’ आणि ‘केशववेणू प्रतिष्ठान’, तसेच सर्व मान्यवर आणि रसिक श्रोते यांचा मी ऋणी आहे अन् या ऋणातच मी राहू इच्छितो. मी आज भारावून गेलो आहे. त्यामुळे अधिक काही बोलू शकत नाही. धन्यवाद !
वेणूगंधर्व जीवनचरित्राचे अनावरण !
या वेळी जगद़्गुरु शंकराचार्य, ज्येष्ठ मूर्तीशास्त्रतज्ञ गो.बं. देगलूरकर आणि मान्यवर यांच्या हस्ते पू. पं. डॉ. केशव गिंडे यांच्या ‘वेणूगंधर्व’ या जीवनचरित्र ग्रंथाचे प्रकाशन करण्यात आले. ‘वेणूगंधर्व’ या ग्रंथाच्या प्रतींनी पू. पं. डॉ. केशव गिंडे यांची ‘ग्रंथतुला’ करण्यात आली. यानंतर या ग्रंथाच्या प्रतींचे उपस्थितांना वाटप करण्यात आले.
पू. पं. डॉ. केशव गिंड यांचे व्यक्तिमत्त्व शुद्ध शाकाहारी, निर्व्यसनी, अहंकाराचा लवलेश नसणारे असे आहे ! – श्री. गो.बं. देगलूरकर, ज्येष्ठ मूर्तीशास्त्रतज्ञ
पू. पं. डॉ. केशव गिंडे हे उत्तम बासरीवादक तर आहेतच; पण त्यांना त्यांच्या देवकीनंदन कुलदेवतेचा आशीर्वादही आहे. वारकरी परंपरेचे ते आजही पालन करतात. शुद्ध शाकाहारी, निर्व्यसनी, अहंकाराचा लवलेश नसणारे असे त्यांचे व्यक्तिमत्त्व आहे. आजच्या काळात आपल्या प्राचीन हिंदु धर्माचे पालन करणारे आणि त्यातून विविध आध्यात्मिक अनुभूती घेणारे कलाकार सापडणे कठीण आहे. अशा आदर्श व्यक्तिमत्त्वाच्या जीवनचरित्र ग्रंथाचे अनावरण करण्याची संधी मला मिळाली, हे मी माझे भाग्य समजतो.
पं. राजेंद्र कुलकर्णी यांना ‘वेणूरत्न’ पुरस्कार प्रदान !
या वेळी ज्येष्ठ बासरीवादक पं. राजेंद्र कुलकर्णी याना ‘वेणूरत्न’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. या वेळी मनोगत व्यक्त करतांना पं. राजेंद्र कुलकर्णी म्हणाले, ‘‘माझ्या दृष्टीने हा जगातला सर्वोच्च आणि अनमोल पुरस्कार आहे. पं. गिंडेगुरुजींच्या सहस्त्रचंद्रदर्शन सोहळ्याच्या प्रसंगी आणि जगद़्गुरु शंकराचार्य यांच्या उपस्थितीत हा पुरस्कार मिळाल्याने मी धन्य झालो आहे. माझ्या वडिलांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त हा पुरस्कार मिळाला, हा अजून एक योग जुळून आला आहे. मी ‘केशववेणू प्रतिष्ठान’चा ऋणी आहे.’’ यानंतर बासरीवादक आणि पू. पं. डॉ. केशव गिंडे यांचे शिष्य श्री. विश्वास कुलकर्णी यांनी पू. पं. पन्नालाल घोष यांची बासरी पू. गिंडे यांना भेट दिली. तिचा विनम्रतेने स्वीकार करत ‘ही बासरी मी पूजेत ठेवीन’, असे पू. गिंडे यांनी सांगितले. यासोबतच ‘संस्कार भारती’, ‘अनाम प्रेम’ आणि अन्य संस्था यांनी पू. गिंडे यांचा सन्मान केला.