पाव, बिस्कीट, टोस्ट आणि खारी, अनेकांचे खिसे भरी !

संग्रहित चित्र

‘अनेकांना खारी, टोस्ट, बिस्कीट आणि पाव इत्यादी बेकरीमधील पदार्थ चहामध्ये बुडवून खाण्याची सवय असते. मुळात हे आपल्या भारतियांचे खाद्यच नाही ! ज्या ठिकाणी ताजे अन्न खायला मिळण्याची सोय नाही, अन्न शिजवण्यासाठी अग्नी आणि पाणी इत्यादी साधने नाहीत किंवा प्रवासामध्ये नेण्यासाठी टिकण्याच्या दृष्टीने असे बेकरीमधील पदार्थ परदेशात बनवले जातात. बेकरीमधील असे सर्व मैद्याचे पदार्थ हे ‘शिळे अन्न’ या प्रकारामध्ये येतात. आयुर्वेदामध्ये ‘शिळे अन्न’ हे आरोग्यासाठी अतिशय अहितकारक म्हणून सांगितले आहे.

वैद्य समीर मुकुंद परांजपे

बेकरीमधील पदार्थांमध्ये ‘डालडा’ (वनस्पती तूप) असल्याने ते खाल्ल्याने अनेकांना घसादुखी होते आणि त्यांची चरबी वाढते. बेकरी पदार्थांमधील मुख्य घटक म्हणजे ‘मैदा.’ हा आतड्यांमध्ये चिकटा निर्माण करणारा आहे आणि तो तिथे तसाच पडून कूज निर्माण होते. यामुळे भूक न लागणे, उत्साहहानी, अम्लपित्त, पचन, मूत्रपिंड यांचे, तसेच पोट फुगणे आणि साफ न होणे, अधोवायू (गुद्द्वारातून वायू बाहेर पडणे), कंबरदुखी, सांधेदुखी, मूळव्याध इत्यादी अनेक प्रकारचे विकार होतात.

या सर्व त्रासांच्या दुष्टचक्रांमध्ये अडकायचे नसल्यास पाश्चात्त्यांचे अंधानुकरण करत बेकरीमधील पदार्थ (शिळे अन्न) खाणे टाळून रोग आणि त्यासह औषध या दोन्हींपासून मुक्त असे खर्‍या अर्थाने औषधांविना निरोगी रहा !

असे ‘पाव, बिस्कीट, टोस्ट आणि खारी खाऊन आरंभी बेकरी मालक अन् पुढे वैद्य, तसेच औषध विक्रेते इत्यादी अनेकांचे खिसे भरायचे ?’ कि ‘आपल्या भारत भूमीत पिकणारा ताजा भाजीपाला खाऊन आणि व्यायाम करून स्वास्थ्य अनुभवायचे ?’, हे प्रत्येकाने विचारपूर्वक ठरवावे !’

– वैद्य समीर मुकुंद परांजपे, खेर्डी, दापोली, रत्नागिरी. (२४.१२.२०२२)

संपर्कासाठी ई-मेल : [email protected]