अमेरिकी ‘ज्‍यूं’कडून शिका !

भारतीय अर्थव्‍यवस्‍थेने आर्थिक क्षेत्रामध्‍ये मोठे यश संपादन करत २ वर्षांपूर्वीच ब्रिटनला मागे टाकले. ‘पुढील काही वर्षे किमान ६.३ टक्‍के सकल देशांतर्गत उत्‍पादन राखल्‍यास भारत हा जपान आणि जर्मनी यांना लवकरच मागे टाकत तिसर्‍या क्रमांकावर येईल’, असे मत ‘मॉर्गन स्‍टॅनली’ या प्रतिष्‍ठित वित्तीय संस्‍थेने व्‍यक्‍त केले आहे. थोडक्‍यात येणार्‍या दशकांमध्‍ये या गतीने पुढे सरसावल्‍यास भारत हा जागतिक महासत्ता बनेल; परंतु ही यशस्‍वी घोडदौड सातत्‍याने होण्‍यासाठी सर्वंकष स्‍तरावर प्रयत्न होणे आवश्‍यक आहे. केवळ आर्थिक समृद्धी आणि त्‍यासाठीचे प्रयत्न पुरेसे नाहीत.

कूटनीतीच्‍या पुढे काय ?

आज भारत आर्थिक क्षेत्रात जे काही यश संपादन करत आहे, ते भारतियांच्‍या परिश्रमासमवेत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि शासनस्‍तरावर होत असलेल्‍या प्रयत्नांमुळे, हे नाकारणे धाडसीपणाचे ठरेल ! गेल्‍या काही कालावधीपासून भारताचे परराष्‍ट्रमंत्री डॉ. एस्. जयशंकर यांची बाणेदार आणि मुत्‍सद्दी भूमिका ही भूराजकीय समीकरणे मग ती युरोप-रशिया या क्षेत्रातील असोत अथवा मध्‍यपूर्वेतील असोत, भारताच्‍या हितामध्‍ये दिशा देण्‍याचे महत्त्वपूर्ण कार्य करत आहे. डॉ. जयशंकर यांचे सुस्‍पष्‍ट विचार पाश्‍चात्त्य शक्‍तींच्‍या भारतावर कुरघोडी करण्‍याच्‍या प्रयत्नांना खीळ बसवत आहेत. ‘महासत्ता बनण्‍यासाठी असे कूटनीतीचे प्रयत्न अत्‍यावश्‍यक आहेत आणि या दिशेनेही आपण अग्रेसर आहोत’, हे निश्‍चितच आशादायी आहे !

परराष्‍ट्र संबंधांमध्‍ये भारत यशस्‍वी होतांना दिसत असला, तरी अनेक घटकांनी भारताला मागे खेचण्‍यासाठी दंड थोपटले आहेत. डॉ. जयशंकर यांनी सांगितल्‍यानुसार हे वेगळ्‍या प्रकारचे युद्ध आहे. ‘बीबीसी’चा भारतविरोधी माहितीपट हा या मोठ्या युद्धाचे एक लघुरूप ! याला ‘इन्‍फॉर्मेशन वॉर’ म्‍हणा अथवा ‘अँटी इंडिया नरेटिव्‍ह’ ! या युद्धाचा सामना करण्‍यासाठी भारतियांनी शत्रूच्‍या गडात राहून त्‍याची परराष्‍ट्रीय धोरणे स्‍वत:च्‍या हितामध्‍ये आखण्‍यास त्‍याला भाग पाडले पाहिजे, हे येथे कळीचे सूत्र !

इस्त्रायल लॉबीने ठरवलेले अमेरिकेचे परराष्ट्र धोरण
(चित्रावर क्लिक करा)

सुखदायी मृगजळ !

मूळचे लक्ष्मणपुरी (उत्तरप्रदेश) येथील नील मोहन हे भारतीय नुकतेच ‘यू ट्यूब’ या जागतिक आस्‍थापनाचे मुख्‍य कार्यकारी अधिकारी बनले. त्‍यामुळे नेहमीप्रमाणे भारतीय बुद्धीमत्ता कशा प्रकारे ‘फोर्च्‍युन ५००’ आस्‍थापनांत स्‍वत:च्‍या यशाचा डंका वाजवत आहे, या चर्चेस उधाण आले. ‘गूगल’चे सुंदर पिचाई, ‘मायक्रोसॉफ्‍ट’चे सत्‍या नडेला, ‘आय.बी.एम्.’चे अरविंद कृष्‍णा, अशी तीच-तीच नावे घेऊन भारतीय एका सुखदायी मृगजळाकडे पहात स्‍वत:ला फसवून समाधान मानत आहेत. याचा एखादा राष्‍ट्रप्रेमी विरोध करू शकतो. ‘मायक्रोसॉफ्‍टचे संस्‍थापक बिल गेट्‍स यांना ‘जगातील कोणत्‍याही एकाच विश्‍वविद्यालयातील अभियंत्‍यांना नोकरी देण्‍याचा विचार केल्‍यास ते विश्‍वविद्यालय कोणते असेल ?’, असे विचारल्‍यावर त्‍यांनी भारतीय ‘आय.आय.टी.ज’चे नाव घेतले होते’, या प्रसंगाची आठवण करून देईल. कोट्यधीश वॉरन बफे यांनी ‘भारतियांची कुशाग्र बुद्धीमत्ता ही भारताच्‍या गौरवशाली भविष्‍याकडे अंगुलीनिर्देश करत आहे’, असे म्‍हटले असले, तरी यांपैकी बहुतांश भारतीय हे स्‍वत:च्‍या ‘करियर’साठी प्रयत्नशील आहेत. ‘एक भारतीय म्‍हणून भारताला त्‍याचा काय लाभ करून देता येईल ?’, याचा विचार भारतातून अमेरिकेत जाऊन ‘मिलिनेअर’ झालेले अभावानेच विचार करतात. हे कटू सत्‍य स्‍वीकारून ‘इंडियन अमेरिकन्‍स’ यांच्‍या विचारसरणीत आमूलाग्र पालट झाल्‍याविना महासत्तेचा मार्ग सुकर होणे कठीण आहे. यासाठी अमेरिकेतील ज्‍यूंचे उदाहरण भारतियांना मार्गदर्शक ठरेल.

२० व्‍या शतकाच्‍या आरंभापासून वॉशिंग्‍टनची धोरणे आखण्‍यामध्‍ये विविध क्षेत्रांतील दबावगट कार्यरत आहेत. या गटांमध्‍ये इस्रायली दबावगटाची कामगिरी अधिक उठून दिसते. ‘दि इस्रायल लॉबी अँड यूएस् फॉरेन पॉलिसी’ या प्रसिद्ध पुस्‍तकातून जॉन मार्शहायमर आणि स्‍टीफन वॉल्‍ट या लेखकांनी अमेरिकेत कार्यरत इस्रायली दबावगट अन् शासन यांच्‍यातील संबंध, तसेच त्‍यान्‍वये अमेरिकेच्‍या परराष्‍ट्रीय धोरणांत इस्रायली हिताचा प्रभाव यांवर प्रकाश टाकला आहे. प्रसंगी ‘अमेरिकी धोरणांच्‍या विरोधात जाऊन अमेरिकेला इस्रायलच्‍या हितामध्‍ये कार्य करावे लागले आहे’, असेही या लेखकांचे म्‍हणणे आहे; परंतु ही ‘इस्रायली लॉबी’ आहे तरी काय ? ज्‍यू संघटना आणि काही ज्‍यू व्‍यक्‍ती त्‍यांचा वेळ अन् पैसा खर्च करून इस्रायलच्‍या हिताला विविध मार्गान्‍वये प्रोत्‍साहन देतात. ‘खुले पत्र’ लिहिणे, ठराव संमत करणे, प्रसिद्धीपत्रके प्रसारित करणे, चर्चासत्रे आणि विचारगट यांच्‍यात वर्चस्‍व प्रस्‍थापित करणे, प्रशासकीय अधिकारी अन् खासदार यांच्‍या इस्रायलच्‍या संदर्भात बैठका आयोजित करणे आदी प्रकारे या संघटना अन् व्‍यक्‍ती कार्य करतात. त्‍यामुळेच छोटाश्‍या; परंतु उत्‍कट राष्‍ट्रभक्‍तीने ओतप्रोत भरलेल्‍या या इस्रायली दबावगटाने अमेरिकेत वर्चस्‍व प्रस्‍थापित केले आहे. एवढे की, तेथील राष्‍ट्राध्‍यक्षपदाचे सर्वच उमेदवार हे इस्रायलचे स्‍पष्‍ट समर्थन करतात. त्‍यामुळ ‘दबावगटांकडून केलेले कार्य हे अनैतिक अथवा अयोग्‍य नाही’, हे लोकशाही राजकारणाचे सार तेथील भारतियांनी लक्षात घेणे आवश्‍यक आहे. दक्षिण आशियात चीनचे वर्चस्‍व अल्‍प करणे नि शक्‍तीचा समतोल राखणे यांसाठी अमेरिका भारताला मोहरा करते, तर भारताला शह देण्‍यासाठी जिहादी पाकला साहाय्‍य करते ! दुसरीकडे रशियावर कुरघोडी करण्‍यासाठी भारतावर डोळे वटारून त्‍याच्‍या भूमिकेवर प्रभाव टाकण्‍याचा आटोकाट प्रयत्नही करते. महासत्ता होण्‍यासाठी अमेरिकेच्‍या आत्‍मकेंद्रित नि धूर्त धोरणाची ‘री’ ओढणे भारताला निश्‍चितच शोभेचे नाही; पण भारताच्‍या हितामध्‍ये अमेरिकेला नमवणे, हे तेथील भारतियांच्‍या हातात आहे आणि नील मोहन यांसारख्‍या व्‍यावसायिकांनी या दिशेने मार्गक्रमण करावे, हेच महासत्तेच्‍या दिशेने भारताला पुढे नेण्‍यास आश्‍वासक पाऊल असणार आहे !

भारताच्‍या महासत्ता होण्‍याच्‍या प्रवासात अमेरिकेतील भारतियांनी दबावगट बनवणे महत्त्वपूर्ण भूमिका बजावू शकते, हे जाणा !