पुणे विभागात लोहमार्गावर वर्षभरात ४६४ जणांचा मृत्यू !

लोहमार्गावर मृत्यू होण्याच्या प्रमाणात २४ टक्क्यांनी वाढ !

पुणे – धोकादायक पद्धतीने लोहमार्ग ओलांडणे, नैराश्यातून रेल्वे गाडीखाली आत्महत्या करणे, आर्थिक विवंचना, कौटुंबिक वाद, प्रेमप्रकरणे इत्यादी घटनांमधून रेल्वेगाडीखाली उडी मारून आत्महत्या करण्याचे प्रमाण वाढले आहे. अशा प्रकारच्या घटनांमध्ये पुणे विभागात मागील वर्षभरात ४६४ जणांचा मृत्यू झाला आहे. लोहमार्गावर मृत्यू होण्याच्या प्रमाणात २४ टक्क्यांनी वाढ झाल्याचे निरीक्षण लोहमार्ग पोलिसांनी नोंदवले आहे, अशी माहिती लोहमार्ग पोलीस दलाचे पुणे विभागाचे पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी दिली.

लोहमार्गाच्या सुरक्षेचे दायित्व लोहमार्ग पोलीस दल आणि रेल्वे सुरक्षा दल यांच्याकडे आहे; मात्र लोहमार्गावर प्रत्येक ठिकाणी बंदोबस्त ठेवणे शक्य नसल्याचे त्यांनी सांगितले. अनेक नागरिक पायपीट वाचवण्यासाठी धोकादायक पद्धतीने लोहमार्ग ओलांडतात त्यामुळे लोहमार्ग ओलांडतांना अपघाती मृत्यू होण्याचे प्रमाण शहरी भागात जास्त आहे, असे त्यांनी सांगितले.

संपादकीय भूमिका 

कमकुवत मनोबलामुळे आत्महत्यांचे वाढते प्रमाण चिंताजनक आहे. आतातरी प्रशासनाने धर्मशिक्षण देऊन जनतेला सक्षम करावे, हीच अपेक्षा !