काँग्रेस नेते पवन खेरा यांना अटक

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वडिलांचा अवमान केल्याचा आरोप

काँग्रेसचे नेते पवन खेरा

नवी देहली – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वडिलांच्या नावाचा अवमान केल्यावरून आसाम पोलिसांनी काँग्रेसचे नेते पवन खेरा यांना देहली विमानतळावरून अटक केली आहे. त्यांना देहली न्यायालयात उपस्थित केल्यानंतर आसामला नेण्यात येणार होते. त्यापूर्वी खेरा यांच्या वतीने सर्वोच्च न्यायालयात याचिका करण्यात आल्यावर सर्वोच्च न्यायालयाने त्यांना देहली न्यायालयात उपस्थित करून अंतरिम जामिनावर सोडण्याचे निर्देश दिले. या प्रकरणाची पुढील सुनावणी २७ फेब्रुवारीला होणार असून तोपर्यंत पवन खेरा यांना नियमित जामिनासाठी अर्ज करावा लागणार आहे. तसेच पवन खेरा यांच्या विरोधात आसाम, वाराणसी आणि लक्ष्मणपुरी येथे गुन्हे नोंदवण्यात आले आहेत. त्यांची सुनावणी एकाच ठिकाणी करावी, असे निर्देशही सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. अटकेपूर्वी पवन खेरा हे पक्षाच्या अन्य सहकार्‍यांसमवेत काँग्रेसच्या अधिवेशनासाठी देहलीहून रायपूरला निघालेले असतांना त्यांना देहली पोलिसांनी विमानातून उतरवले होते.

पवन खेरा यांनी २० फेब्रुवारी या दिवशी देहलीमध्ये पत्रकारांशी बोलतांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वडिलांचे ‘दामोदरदास’ हे नाव उच्चारण्याऐवजी ‘गौतमदास’ असे नाव उच्चारले होते. नंतर चूक लक्षात आल्यावर त्यांनी क्षमा मागितली होती.