‘अल्ला’ संस्कृत शब्द असून तो श्री दुर्गादेवीच्या आवाहनासाठी वापरला जातो ! – शंकराचार्य स्वामी निश्चलानंद सरस्वती

शंकराचार्य स्वामी निश्चलानंद सरस्वती यांचा दावा !

शंकराचार्य स्वामी निश्चलानंद सरस्वती

वाराणसी (उत्तरप्रदेश) – ‘अल्ला’ हा शब्‍द मातृशक्‍तीचे प्रतीक आहे. तो संस्‍कृत शब्‍द आहे. श्री दुर्गादेवीच्‍या आवाहनासाठी ‘अल्ला’ शब्‍दाचा वापर केला जातो. ज्‍याचा व्‍याकरणाचा अभ्‍यास आहे, त्‍याला हे ठाऊक आहे. असा दावा पुरीच्‍या पुर्वाम्‍नाय गोवर्धनपीठाचे शंकराचार्य जगद़्‍गुरु स्‍वामी निश्‍चलानंद सरस्‍वती यांनी येथे केले. ते येथील दक्षिणामूर्ती मठामध्‍ये जिज्ञासूंच्‍या प्रश्‍नांना उत्तर देत होते. ‘हिंदु धर्मावर प्रश्‍न उपस्‍थित करणार्‍यांनी आधी संस्‍कृत आणि व्‍याकरण यांचा अभ्‍यास करावा’, असेही त्‍यांनी या वेळी स्‍पष्‍ट केले.

जमियत उलेमा-ए-हिंदचे नेते मौलाना अर्शद मदनी यांनी ‘ॐ आणि अल्ला एकच आहे’, असे विधान केले होते. त्‍यावर शंकराचार्य यांनी टीका केली. ते म्‍हणाले की, ॐ हे परमात्‍म्‍याचे नाम आहे. सर्वांचे पूर्वज सनातन आर्य हिंदु होते. सनातन धर्म आहे, तर अन्‍य सर्व पंथ आहेत. सनातन धर्माचे पालन केल्‍याने जीवनात सुख आणि मृत्‍यूनंतर सद़्‍गती मिळू शकते.

बायबल आणि कुराण यांच्यावर टीका करण्याचे धाडस आहे का ?

शंकराचार्य पुढे म्‍हणाले की, हिंदु दुर्बल नाहीत आणि त्‍यांना दुर्बल समजूही नये. सातत्‍याने सनातन धर्मावर टीका करणार्‍यांनी लक्षात ठेवले पाहिजे की, कुणाच्‍या साधेपणाचा आणि सहिष्‍णुतेचा अपलाभ घेऊ नये. ‘श्रीरामचरितमानस’वर टीका करणार्‍यांनी चाणक्‍य नीतीचा अभ्‍यास करावा. ‘श्रीरामचरितमानस’वर टीका करणार्‍यांमध्‍ये अन्‍य धर्मांच्‍या ग्रंथांवर टीपणी करण्‍याचे धाडस नाही. जे रामायणावर बोलत आहेत त्‍यांच्‍यात धाडस असेल, तर बायबल आणि कुराण यांच्‍यावर टीका करून दाखवा; मग काय होते बघा.

 

(सौजन्य : ETV Bharat Uttar Pradesh)

नेपाळच्‍या पंतप्रधानांनी काठमांडूच्‍या ग्रंथालयाला आग लावली !

शंकराचार्य यांनी सांगितले की, मी नुकतेच नेपाळहून परतलो आहे. तेथील पंतप्रधानाने काठमांडू येथील ग्रंथालयाला आग लावली. या ग्रंथांनी तुमचे काय वाईट केले होते ? जे पूर्वी नालंदा आणि आता नेपाळमध्‍ये झाले ते योग्‍य नाही. पूर्वीही सनातन धर्मावर अन्‍याय झाला आहे.

पंडित धीरेंद्रकृष्ण शास्त्री यांना हनुमंताचे आशीर्वाद !

प्रसारमाध्यमांशी संवाद साधतांना शंकराचार्यांनी बागेश्वर धामचे पंडित धीरेंद्रकृष्ण शास्त्री यांचे समर्थन केले. ते म्हणाले की, ‘धीरेंद्रकृष्ण शास्त्री यांना हनुमंताचा आशीर्वाद आहे. राजकारण आणि धर्म एकमेकांपासून वेगळे होऊ शकत नाहीत. धर्माखेरीज राजकारण होऊ शकत नाही’, असेही त्यांनी स्पष्ट केले.

वर्ष २०२४ मध्येही नरेंद्र मोदी पंतप्रधान होतील !

शंकराचार्य म्हणाले की, वर्ष २०२४ मध्येही नरेंद्र मोदीच पंतप्रधान होतील; कारण देशाला लुटून घर भरणार्‍या नेत्यांपैकी ते नाहीत.