चंद्रभागा आणि इंद्रायणी नद्या स्‍वच्‍छ ठेवाव्‍यात ! – ह.भ.प. माऊली महाराज वाबळे, प्रसिद्ध कीर्तनकार

ह.भ.प. माऊली महाराज वाबळे

नवी मुंबई – राज्‍यातील नद्यांचे वाढते प्रदूषण पहाता भाविकांनी चंद्रभागा आणि इंद्रायणी नदी स्‍वच्‍छ ठेवावी, असे आवाहन जुन्‍नर येथील प्रसिद्ध कीर्तनकार ह.भ.प. माऊली महाराज वाबळे यांनी येथे केले. तुर्भे सेक्‍टर २१ मधील शिवप्रतिष्‍ठान (शिव मंदिर) यांच्‍या वतीने येत्‍या महाशिवरात्रीच्‍या निमित्ताने अखंड हरिनाम सप्‍ताहाचे आयोजन करण्‍यात आले आहे. यामध्‍ये श्री ग्रंथराज ज्ञानेश्‍वरी पारायण सोहळाही होणार आहे. १९ फेब्रुवारी या दिवशी या सोहळ्‍याची सांगता कर्जत येथील ह.भ.प. प्रवीण महाराज फराट यांच्‍या कीर्तनाने होणार आहे. १८ फेब्रुवारी या दिवशी दिंडी सोहळा होणार असून विनामूल्‍य नेत्रचिकित्‍सा शिबिराचे आयोजनही करण्‍यात आले आहे.

कीर्तनाचे पहिले पुष्‍प गुंफतांना वाबळे महाराज यांनी समाजात चालू असलेल्‍या अयोग्‍य गोष्‍टींवर परखड भाष्‍य केले. पालटत्‍या काळानुसार शिक्षणाचे महत्त्व सांगून वाढत्‍या वयासह मुले आणि मुली यांनी पळून जाऊन विवाह करून आई-वडिलांना दुःख न देता कर्तव्‍य भावनेने कसे आचरण करावे ? याविषयीही त्‍यांनी सांगितले. ‘स्‍थानिक जनता आणि भाविक यांनी पांडुरंगाच्‍या दर्शनाला जातांना चंद्रभागा अन् इंद्रायणी नदी स्‍वच्‍छ ठेवून पर्यावरण रक्षण करावे’, असे आवाहन त्‍यांनी केले.