‘व्‍हॅलेंटाईन डे’ला विरोध कुणाचा ?

‘व्‍हॅलेंटाईन डे’ला विरोध केला जात आहे, असे चित्र गेल्‍या काही वर्षांत प्रकर्षाने तरी दिसून आलेले नाही. यामागे विविध कारणे आहेत, असे लक्षात येते. यातील प्रमुख कारण ‘तरुण पिढीची मते’ ! प्रत्‍येक वर्षी मतदारसूचीमध्‍ये १८ वर्षे पूर्ण झालेल्‍या तरुणांची नावे वाढतात आणि अशा तरुणांना आपल्‍याकडे वळवण्‍यासाठी संस्‍कृतीप्रेमी राजकीय पक्ष त्‍यांना दुखावू इच्‍छित नाहीत. अशा तरुणांचे वयच प्रेम करण्‍याचे असते आणि त्‍यांच्‍या या संवेदनशील विषयाला कुणी दुखावू इच्‍छित नसल्‍याने काही राजकीय पक्ष अन् त्‍यांच्‍याशी संबंधित संघटना यांनी आता यावर मौन पाळणेच पसंत केले आहे, हे लक्षात येते. याला आणखी एक कारण म्‍हणजे ‘व्‍हॅलेंटाईन डे’ला करण्‍यात आलेल्‍या आक्रमक विरोधामुळे त्‍याला समाजाकडून नाकारण्‍यात आले. त्‍या वेळी यावरून मोठा वादही झाला होता. एखाद्या संवेदनशील गोष्‍टीला विरोध करतांना काही पथ्‍य पाळून आणि ‘समाजामध्‍ये त्‍यामुळे नकारात्‍मक प्रतिमा निर्माण होणार नाही ना ?’ याची काळजी घेण्‍याची आवश्‍यकता लक्षात आली. आपला हेतू चांगला असला, तरी आपण कसे व्‍यक्‍त होत आहोत ? हे येथे पहाणे आवश्‍यक ठरते; मात्र त्‍यामुळे एखाद्या अयोग्‍य गोष्‍टीला विरोध करू नये, असेही करता येणार नाही. विरोधाचे माध्‍यम पालटून अयोग्‍य गोष्‍ट थांबवणे आवश्‍यक ठरते. त्‍या दृष्‍टीने प्रयत्न करत रहायला हवे, तरच आपण संस्‍कृतीरक्षक ठरू शकतो.

संतश्री पूज्‍यपाद आसारामजी बापू यांनी ‘व्‍हॅलेंटाईन डे’च्‍या दिवशी ‘मातृ-पितृ दिन’ साजरा करण्‍याचे आवाहन केल्‍यानंतर गेली अनेक वर्षे अशा प्रकारे हा दिवस त्‍यांच्‍या भक्‍तांकडून आणि समाजातील काही संघटना, संस्‍था यांच्‍याकडून साजरा केला जात आहे. एखाद्या चुकीच्‍या गोष्‍टीला दुसरा चांगला पर्याय देण्‍यात आला, तर तो अधिक महत्त्वाचा मानला जाऊ शकतो, हे यातून लक्षात येते. भारतीय संस्‍कृतीमध्‍ये प्रेमाला कधीही विरोध करण्‍यात आलेला नाही; मात्र पाश्‍चात्त्यांच्‍या ओंजळीने पाणी पिण्‍याची भारतियांची जी मानसिकता आहे, ती दूर करण्‍यासाठीच ‘व्‍हॅलेंटाईन डे’ला विरोध केला जात होता आणि होत आहे. विरोधामुळे ‘व्‍हॅलेंटाईन डे’ला पूर्वीप्रमाणे प्रतिसाद मिळत आहे, असेही कुठे प्रकर्षाने दिसत नाही. पूर्वी ‘व्‍हॅलेंटाईन डे’च्‍या माध्‍यमातून व्‍यावसायिक लाभ घेण्‍याचा प्रयत्न केला जात होता. ‘व्‍हॅलेंटाईन डे’ला आक्रमक विरोध झाल्‍यानंतर, तोडफोड झाल्‍यानंतर अनेकांनी व्‍यावसायिक लाभ घेण्‍याचे टाळले. त्‍यामुळेही याचा प्रभाव काही प्रमाणात तरी अल्‍प झाल्‍याचे दिसत आहे. आता आक्रमक विरोध होत असल्‍याचे दिसत नसल्‍यामुळे कुणी म्‍हणेल, ‘हा प्रेमाचा विजय आहे. प्रेमाला धर्म, देश, संस्‍कृती यांचे बंधन असू शकत नाही.’ ‘प्रेम हे प्रेम असते, तुमचे आमचे ‘सेम’ असते’, अशी मंगेश पाडगावकरांच्‍या कवितेची ओळ ऐकवून दाखवली जाऊ शकते; मात्र ‘हे सत्‍य नाही’, हे सांगायला हवे.  प्रशासन आणि पोलीस यांना या संदर्भात निवेदन देऊन काही संघटना वैध मार्गाने विरोध दर्शवत आलेल्‍या आहेत आणि आताही करत आहेत. आता पोलीस आणि प्रशासन यांनी त्‍यांच्‍या स्‍तरावर भारतीय संस्‍कृतीच्‍या विरोधात ‘व्‍हॅलेंटाईन डे’च्‍या दिवशी सार्वजनिक ठिकाणी काही अयोग्‍य कृती, अश्‍लील चाळे केले जात नाहीत ना ? याकडे लक्ष देऊन त्‍या थांबवणे आवश्‍यक आहे. त्‍यासाठी तरी हिंदू आणि हिंदूंच्‍या संघटना यांनी त्‍यांच्‍यावर दबाव निर्माण करण्‍याची आवश्‍यकता आहे.

भारतीय संस्‍कृतीनुसार दिन हवेत !

‘व्‍हॅलेंटाईन डे’च्‍या दिवशी गायीला आलिंगन देण्‍याचा दिवस साजरा करण्‍याचे आवाहन केंद्रशासनाच्‍या पशूकल्‍याण मंडळाने आधी केले आणि नंतर त्‍याला विरोध झाल्‍यानंतर तो मागे घेतला. हा जो विरोधकांचा दबाव होता, त्‍याच्‍यासमोर मंडळ झुकले, हे लक्षात घ्‍यायला हवे. जर हिंदूंचा दबाव गट अधिक भक्‍कम असता, तर अशी स्‍थिती आली नसती. तसेच मंडळाने या निर्णयापूर्वी हिंदु संघटनांना विश्‍वासात घेऊन मोर्चेबांधणी केली असती, तर विरोध करणार्‍यांचा प्रखर प्रतिवाद होऊ शकला असता; मात्र ‘मंडळाने कच खाल्ली’, असेच चित्र हिंदुत्‍वनिष्‍ठांमध्‍ये गेल्‍याचे लक्षात येते. ‘व्‍हॅलेंटाईन डे’सारखे दिवस साजरे करणे, ही भारतियांची संस्‍कृती नाही; मात्र भारतीय संस्‍कृतीनुसार काही गोष्‍टी साजर्‍या गेल्‍या जातात. त्‍यात वसुबारस किंवा बैलपोळा साजरा केला जातो. भाऊबीज, रक्षाबंधन, वटसावित्री, हे सण म्‍हणून साजरे केले जातात. भारतानेच आंतरराष्‍ट्रीय स्‍तरावर योगदिन साजरा करण्‍यासाठी पुढाकार घेतला आणि तो आता साजरा केला जात आहे. अशा प्रकारेही प्रयत्न केला जाऊ शकतो. भारतीय संस्‍कृतीचा याद्वारे प्रसार होईल आणि त्‍याची महानताही लक्षात येईल. हिंदूंना धर्मशिक्षण नसल्‍यामुळे ते पाश्‍चात्त्यांच्‍या मोहमायेतील गोष्‍टींकडे आकृष्‍ट होतात आणि त्‍याचे अंधानुकरण करतात. जर हिंदूंना धर्मशिक्षण मिळत असेल, तर ते अशा गोष्‍टींपासून दूर रहातील आणि स्‍वतःहून त्‍याचा विरोध करतील.

हिंदु राष्‍ट्राची अपरिहार्यता !

गेल्‍या काही वर्षांपासून देशात हिंदुत्‍वाचे वारे मोठ्या प्रमाणात वाहू लागले आहे. हिंदु राष्‍ट्राची मागणीही जोर धरू लागली आहे. हिंदुत्‍वाच्‍या आधारे काही निर्णय घेतल्‍याचे दिसू लागले आहे. देशात हिंदु राष्‍ट्राची स्‍थापना झाल्‍यावर अधिकृतपणे हिंदु संस्‍कृतीच्‍या विरोधातील गोष्‍टी थांबवता येऊ शकतात. त्‍यात ‘व्‍हॅलेंटाईन डे’ हाही असणार, यात शंका नाही. एकेक गोष्‍ट रोखण्‍यात श्रम करण्‍यापेक्षा थेट हिंदु राष्‍ट्र स्‍थापन करण्‍यासाठी श्रम घेतले, तर ते खर्‍या अर्थाने सार्थकी लागतील. त्‍याद्वारे गोहत्‍या बंदी, धर्मांतरविरोधी कायदा, लोकसंख्‍या नियंत्रण कायदा, समान नागरी कायदा आदी राष्‍ट्र आणि धर्म यांच्‍या संदर्भातील महत्त्वाचे निर्णय घेता येऊ शकतील. आताच्‍या स्‍थितीमध्‍ये असे निर्णय घेण्‍यामध्‍ये अनेक बंधने येत आहेत, हेही लक्षात येते. हिंदु राष्‍ट्र झाल्‍यास भारतातीलच नव्‍हे, तर इस्‍लामी देशांतील हिंदूंच्‍या रक्षणासाठी पुढाकार घेऊन आणि क्षमतेने प्रयत्न करता येतील. त्‍याला मोठे यशही मिळेल, हे नाकारता येत नाही.

‘व्‍हॅलेंटाईन डे’चा समाजावरील पूर्ण प्रभाव दूर होईपर्यंत विरोध करत रहाणे आवश्‍यक आहे !