वर्ष २०११ च्या लोकसंख्येनुसार १२५ कोटी लोकसंख्येच्या भारतात १० कोटींहून अधिक ज्येष्ठ नागरिक असून त्यांच्यासाठीच्या सुविधांची पहाणी करण्यात आली. देशात १ सहस्र १५० वृद्धाश्रम असून त्यामध्ये ९७ सहस्र ज्येष्ठ नागरिकच राहू शकतात, असे त्यात म्हटले आहे. महाराष्ट्रात २४ वृद्धाश्रम ‘मातोश्री वृद्धाश्रम योजने’च्या अंतर्गत विनाअनुदान तत्त्वावर चालवले जातात. स्वत:ला सुसंस्कृत समजल्या जाणार्या अतीसुसंस्कृत पुण्यात सर्वाधिक म्हणजे ६५ वृद्धाश्रम आहेत. यावरून आई-वडिलांना न सांभाळण्याची स्वार्थी आणि दायित्वशून्य वृत्ती समाजात वाढत आहे, असेच म्हणावे लागेल.
ज्येष्ठांना स्मृतीभ्रंश, अर्धांगवायूचा झटका यांसारख्या परिस्थितीमध्ये विशेष सेवांची आवश्यकता असतांना देशात अशा व्यक्तींसाठी केवळ १५ वृद्धाश्रम आहेत. त्यामुळे ज्येष्ठांना सांभाळणारी व्यवस्थाच शासन किंवा समाज यांच्याकडूनही होऊ शकली नसल्याचे एका सर्वेक्षणाचे निरीक्षण आहे. वर्ष २०५० मध्ये भारत सर्वाधिक ज्येष्ठ व्यक्तींचा देश होणार आहे. त्यामुळे त्यांच्यासाठी जीवन जगण्याची व्यवस्था उभारण्याची आवश्यकता व्यक्त करण्यात आली आहे. सध्याच्या वृद्धाश्रमांमध्ये क्षमतेहून अधिक वृद्धांना सामावून घेण्याचा प्रयत्न होतो. त्यामुळे त्यासाठीची प्रतीक्षा सूची सतत वाढत आहे, तसेच वृद्धाश्रमांमध्ये वृद्धांना मिळणार्या सुविधा, त्यांना मिळणारी वागणूक आणि एकूणच तेथील व्यवस्था कशी असते ? हाही एक प्रश्न आहे. येथे लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे भारतातील सर्वच्या सर्व म्हणजे १ सहस्र १५० वृद्धाश्रमांत एकही मुसलमान वृद्धाश्रम नाही. अहवालानुसार मुसलमान समाज आई-वडिलांना सांभाळतात आणि त्यांची देखभाल करतात. मग आपली हिंदु संस्कृती तर सर्वांत प्राचीन आणि महान आहे. आई-वडिलांनाच ईश्वर मानून त्यांची सेवा करणार्या श्रावण बाळाची आपली संस्कृती असतांना सरकारला ‘श्रावण बाळ योजना’ आणावी लागते, हे हिंदूंसाठी लज्जास्पद आहे. वृद्धाश्रम आणि अनाथाश्रम हा हिंदु संस्कृतीवरचा कलंक आहे. आपले आई-वडील मुलांना जड व्हावेत इतकी वाईट वृत्ती समाजात वाढली आहे, याचा गांभीर्याने विचार होणे आवश्यक आहे.
हे सर्व लक्षात घेता समाजात वाढलेली स्वार्थी वृत्ती नष्ट होण्यासाठी साधना आणि सुसंस्कार हाच एकमेव उपाय आहे, हे लक्षात घेऊन त्या दृष्टीने प्रयत्न केल्यास भविष्यात वृद्धाश्रमांची आवश्यकताच भासणार नाही.
– सौ. अपर्णा जगताप, पुणे