सातारा, ७ फेब्रुवारी (वार्ता.) – विभागीय आयुक्त कार्यालय स्तरावर मुख्यमंत्री सचिवालय कक्षाचे क्षेत्रीय कार्यालय सातारा येथील जिल्हाधिकारी कार्यालयात स्थापन करण्यात आले आहे. या कक्षाच्या वतीने सर्वसामान्य जनतेचे दैनंदिन प्रश्न, शासनस्तरावर आलेली कामे आणि त्याविषयी प्राप्त होणारे अर्ज, निवेदने आदींवर कार्यवाही करण्यात येणार आहे. या कक्षाचा अधिकाधिक नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी केले.
मुख्यमंत्री सचिवालय कक्षाच्या क्षेत्रीय कार्यालयाची माहिती देण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेमध्ये ते बोलत होते. जिल्हाधिकारी जयवंशी पुढे म्हणाले की, मुख्यमंत्री सचिवालय कक्षाच्या क्षेत्रीय कार्यालयाचे क्षेत्रीय अधिकारी निवासी उपजिल्हाधिकारी असणार आहेत. या कक्षाला पुरेसे अधिकारी आणि कर्मचारीही देण्यात आले आहेत. नागरिकांच्या तक्रारींना सांकेतिक क्रमांक (युनिक कोड) देण्यात येणार आहेत. ही कार्यवाही संपूर्णपणे ‘ऑनलाईन’ पद्धतीने होणार आहे. मंत्रालय स्तरावर अर्जाच्या प्रगतीविषयी लक्ष ठेवण्यात येणार आहे. यामुळे ग्रामीण भागातील नागरिकांना कोणत्याही कामासाठी मंत्रालय स्तरावर जाण्याची आवश्यकता भासणार नाही. जिल्ह्यातच त्यांचे प्रश्न सोडवले जातील. जे प्रश्न सोडवण्यासाठी धोरणात्मक निर्णय घ्यायचे असतील, असेच प्रश्न मंत्रालय स्तरावर पाठवण्यात येणार आहेत. जे प्रश्न सोडवता येणार नाहीत, ते कारणांसह संबंधितांना लेखी कळवण्यात येतील. हा उपक्रम मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण राज्यात राबवण्यात येत आहे. सर्वसामान्य जनतेचे दैनंदिन प्रश्न, शासन स्तरावर असलेली कामे, यांविषयी प्राप्त होणारे अर्ज आणि निवेदने याविषयी अधिकाधिक लोकाभिमुखता, पारदर्शकता आणि गतिमानता आणण्याचा महाराष्ट्र शासनाचा उद्देश आहे.