बेंगळुरू शहरातील सिंगासंद्राजवळ बांधण्यात आलेली अवैध मशीद हटवा !

हिंदू संघटनांची महापालिकेकडे मागणी

बेंगळुरू महापालिकेचे आयुक्त श्री. तुषार गिरीनाथ यांना निवेदन देताना हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे कार्यकर्ते

बेंगळुरू (कर्नाटक) – शहरातील वॉर्ड क्रमांक १९१ मधील सिंगसंद्रा येथे असणार्‍या उच्च दाबाच्या वीजवाहिन्यांच्या खाली मशिदीसाठी करण्यात आलेले भव्य बांधकाम हटवण्यासाठी बेंगळुरू महापालिकेच्या आयुक्तांना हिंदुत्वनिष्ठ संघटनांकडून निवेदन सादर करण्यात आले. यावर आयुक्त श्री. तुषार गिरीनाथ यांनी विभागाचे साहाय्यक कार्यकारी अभियंता यांना बांधकाम पाडण्याची सूचना केली.

याविषयी हिंदु जनजागृती समितीचे कर्नाटक राज्य प्रवक्ते श्री. मोहन गौडा म्हणाले की, हे बांधकाम कर्नाटक वीज नियामक आयोगाच्या नियम २००५ चे घोर उल्लंघन करणारे आहे. या अवैध बांधकामामुळे परिसरातील कायदा अन् सुव्यवस्था राखण्याचे आव्हान पोलिसांसमोर निर्माण झाले आहे. याविषयी स्थानिकांच्या तक्रारी असतांनाही हे अवैध बांधकाम रोखण्यासाठी कोणतीही कारवाई होत नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. हिंदूंच्या अवैध बांधकामाकडे अधिकारी असेच दुर्लक्ष करतील का ? इतर समाजाच्या अवैध बांधकामांविषयी महापालिका गप्प का ? महापालिकेच्या अधिकार्‍यांनी हा प्रश्न गांभीर्याने घ्यावा आणि मशिदीचे अवैध बांधकाम तात्काळ थांबवण्यासाठी पावले उचलावीत. ‘अधिकार्‍यांनी कर्तव्यात कसूर केल्यास उच्च न्यायालयात जाऊ’, अशी चेतावणी श्री. गौडा यांनी दिली.

_________________________________________ 

निवेदन देतांना श्रीमती शकिला शेट्टी, विजया विवेक प्रतिष्ठान बेंगळुरू; श्री. प्रेमानंद, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, बोम्मनहळ्ळी; सौ. शुभा बी. नाईक, अधिवक्ता, कर्नाटक उच्च न्यायालय; अधिवक्ता गुरुप्रसाद, अधिवक्ता गंगाधर आणि फोरम फॉर हिंदू ऑर्गनायझेशनचे सदस्य या वेळी उपस्थित होते.