राज्यातील विद्यापीठ, महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचार्यांचा परीक्षेच्या कामकाजावर बहिष्कार !
सोलापूर – राज्यभरातील विद्यापीठ आणि महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचार्यांनी परीक्षेच्या कामकाजावर बहिष्कार टाकला आहे. त्यामुळे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापिठाच्या तसेच शिवाजी विद्यापिठाच्या २ फेब्रुवारीपासून होणार्या सर्व परीक्षा पुढील आदेशापर्यंत स्थगित करण्यात आल्या आहेत, अशी माहिती परीक्षा आणि मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. शिवकुमार गणपूर यांनी दिली आहे.
(सौजन्य : ABP MAJHA)
आंदोलनकर्त्यांनी सांगितले की, वर्ष २०१६ पासून शिक्षकेतर कर्मचारी स्वत:च्या विविध मागण्यांसाठी वेगवेगळ्या पद्धतीने आंदोलन करत आहेत; मात्र शासनाकडून केवळ आश्वासनाविना काहीही मिळत नाही. प्रत्येक वेळेस विद्यार्थ्यांची हानी होऊ नये म्हणून आम्ही आंदोलन मागे घेत होतो. राज्यातील २८८ पैकी जवळपास २०० आमदारांना या संदर्भात पत्र दिले आहे. सर्व खासदारांनाही या संदर्भात कळवलेले आहे. उच्च शिक्षण मंत्र्यांकडेही निवेदनाद्वारे मागणी केली होती; मात्र या मागण्यांची नोंद न घेतल्याने आम्ही आजपासून परीक्षेच्या कामकाजावर बहिष्कार टाकत आहोत. २० फेब्रुवारीपासून परीक्षेसह सर्वच पद्धतीचे कामकाज बंद करण्याची चेतावणी महाविद्यालयीन आणि विद्यापीठ शिक्षकेतर कर्मचार्यांनी दिली आहे. अनेक विद्यार्थी परगावाहून येतात. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या आर्थिक हानीसह, परीक्षा स्थगित झाल्यामुळे मानसिक हानीही होत आहे. त्यामुळे राज्यशासनाने विद्यार्थ्यांची हानी होऊ नये, अशा पद्धतीची भूमिका घ्यावी, अशी प्रतिक्रिया विद्यार्थ्यांनी दिली आहे.