राज्‍यातील सर्व बालसुधारगृहांत कौशल्‍यविकास केंद्र चालू करणार ! – मंगलप्रभात लोढा, महिला आणि बाल विकासमंत्री

मंगलप्रभात लोढा, महिला आणि बाल विकासमंत्री

मुंबई – बालकांमध्‍ये शिक्षणासमवेत आवश्‍यक कौशल्‍ये विकसित होण्‍यासाठी कौशल्‍य विकास विभाग आणि महिला अन् बालविकास विभाग प्रयत्नशील आहे. मुंबईमधील डोंगरी येथील निरीक्षणगृह आणि मानखुर्द येथील बालगृह येथे नव्‍याने चालू केलेल्‍या कौशल्‍यविकास केंद्राच्‍या धर्तीवर राज्‍यातील बालसुधारगृहांमध्‍ये कौशल्‍यपूर्ण शिक्षणाचे केंद्र चालू करणार आहोत, अशी माहिती, कौशल्‍य, रोजगार अन् उद्योजकता, महिला आणि बाल विकासमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी दिली. डोंगरी येथील चिल्‍ड्रन एड सोसायटीमध्‍ये १ फेब्रुवारी या दिवशी कौशल्‍यविकास केंद्राच्‍या उद़्‍घाटनप्रसंगी ते बोलत होते.

या वेळी ते म्‍हणाले, चिल्‍ड्रन एड सोसायटीच्‍या मानखुर्द येथील बालगृहामध्‍ये फॅशन डिझायनिंग, फ्रेम डिझायनिंग, संगणक याचे कौशल्‍यपूर्ण शिक्षण विद्यार्थ्‍यांना दिले जाणार आहे. डोंगरी येथील निरीक्षणगृहात टाटा मोटर्सच्‍या माध्‍यमातून ३ मासांचे प्रशिक्षणवर्ग चालू करण्‍यात आले आहेत. यामध्‍ये भ्रमणभाष दुरुस्‍ती, दुचाकी आणि इलेक्‍ट्रिक यांचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. बालगृहातील मुलांना शिक्षणासमवेत कौशल्‍यविकासाचे शिक्षण देण्‍यासाठी महिला बालविकास विभाग प्रयत्नशील आहे.

या वेळी निरीक्षणगृहातील मुलांसाठी चालू असलेल्‍या संगणक प्रशिक्षण, सुतार प्रशिक्षण, शिवणकला, कलाकुसरीच्‍या वस्‍तू यांच्‍या प्रशिक्षणवर्गासही मंत्री लोढा यांनी भेट दिली

संपादकीय भूमिका

कौशल्‍यविकास केंद्रासमवेत धर्मशिक्षण वर्गही चालू करावेत !