शिक्षक हा राष्ट्राचा ‘कणा’ असतो. ज्याप्रमाणे शेतकरी राष्ट्राचे पालनपोषण करतो, त्याचप्रमाणे राष्ट्राच्या भावी पिढीला ‘नैतिक मूल्ये’ देऊन त्यांना बौद्धिक स्तरावर सक्षम बनवण्याचे दायित्व, हे शिक्षकांचे असते; पण ‘वैयक्तिक स्वार्थापोटी जेव्हा शिक्षकच ‘नैतिक मूल्यांना’ तिलांजली देतात, तेव्हा विद्यार्थ्यांनी आदर्श म्हणून कुणाकडे पहायचे ?’, असा प्रश्न पालकांच्या मनात येतो. जनतेच्या मनात असा विचार येणारा पुढील प्रसंग अनेक गोष्टी सांगून जातो.
बीड जिल्ह्यात नोकरीमध्ये स्थानांतरासाठी (बदलीसाठी) सोयीचे ठिकाण मिळावे, यासाठी शिक्षकांनी स्वतःसह नातेवाइकांना दिव्यांग दाखवण्याचा प्रकार घडला. यात ५२ शिक्षकांचे निलंबन करण्यात आले. जिल्हा परिषदेतील वर्ष २०२२ अंतर्गत प्राथमिक शिक्षकांच्या ‘ऑनलाईन’ प्रणालीद्वारे स्थानांतर करण्याची प्रक्रिया राबवण्यात आली होती. शासन निर्णयाद्वारे दिव्यांग, आजारी असणारे यांच्यासाठी विशेष तरतूद आहे. याच अनुषंगाने जिल्ह्यातील शिक्षकांनी स्वतःसह नातेवाइकांना आजारी, तसेच दिव्यांग असल्याचे खोटे प्रमाणपत्र काढले. या अपप्रकाराविषयी सामाजिक कार्यकर्त्यांनी तक्रार केली, तेव्हा शिक्षकांची अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय रुग्णालयात तपासणी करण्यात आली. यामध्ये ५२ शिक्षकांचे प्रमाणपत्र खोटे असल्याचे लक्षात आले. त्यामुळे त्यांच्यावर तात्पुरत्या स्वरूपात निलंबनाची कारवाई करण्यात आली.
स्वतःच्या सोयीच्या दृष्टीने स्थानांतर करण्यासाठी चुकीचा मार्ग अवलंबायचा, हे धोरण शिक्षकांनी अवलंबणे चुकीचे आहे. पूर्वीच्या काळी विद्यार्थी घडवण्यासाठी शिक्षक हवे ते कष्ट घ्यायचे; पण आता प्रवासाच्या, तसेच इतर सर्व शासकीय सुविधा असतांनाही शिक्षक थोडे कष्ट घ्यायला सिद्ध नाहीत. अशा शिक्षकांकडून भावी पिढी कशा प्रकारे घडेल ?
शिक्षकांमध्ये अनुशासन, स्वयंशिस्त, स्वतःसह विद्यार्थ्यांमध्ये पालट घडवण्याचा निश्चय आणि समाजासाठी झोकून देऊन काम करण्याची वृत्ती असणे आवश्यक आहे. असे असेल तरच ते विद्यार्थ्यांना पालटू शकतात आणि त्यांना दिशा देऊ शकतात. आदर्श विद्यार्थी घडवण्यासमवेत, आदर्श शिक्षक घडवण्यासाठी कार्यशाळा सरकारने आयोजित करायला हवेत, असे म्हणण्याची वेळ आली आहे, हे दुर्दैवी !
– श्री. जयेश बोरसे, पुणे