देहलीमध्ये शिखांच्या धार्मिक संस्थेकडून चालवण्यात येणार्‍या शाळेत श्री सरस्वतीदेवीची पूजा केल्याने शिक्षिका निलंबित !

नवी देहली – येथील वसंत विहार परिसरातील गुरु हरकिशन सिंह पब्लिक स्कूलमध्ये संगीत शिक्षिकेने श्री सरस्वतीदेवीची पूजा केल्यावरून तिला निलंबित करण्यात आले आहे. ‘देहली सिख गुरुद्वारा प्रबंधक कमेटी’कडून ही शाळा चालवली जाते. या कमेटीने या पूजेला विरोध केला होता. शीख नेत्यांनी पूजेला आक्षेप घेतल्यानंतर आता कमेटीने या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी एका समितीची स्थापना केली आहे.

‘देहली सिख गुरुद्वारा प्रबंधक कमेटी’चे अध्यक्ष हरमीतसिंह कालका यांनी सांगितले की, या शिक्षिकेने श्री सरस्वतीदेवीची मूर्ती ठेवून पूजा केली होती. याची माहिती समोर आल्यावर आम्ही आक्षेप घेतला होता. यानंतर शाळेच्या मुख्याध्यापिकेने शिक्षिकेला नोटीस बजावली होती. यावर शिक्षिकेने उत्तर दिले, ‘प्रतिवर्षी आम्ही अशा प्रकारे पूजा करत आलो आहोत.’ यानंतर शिक्षिकेला निलंबित करण्यात आले. आमच्या कमेटीकडून शिक्षणाविषयी शिखांच्या मर्यादेचे पूर्ण भान ठेवले जाते. या प्रकरणाच्या चौकशीसाठी नेमलेली समिती या पूजेमागे राजकीय षड्यंत्र तर नाही, याचा शोध घेईल. जर अशा प्रकारे मूर्ती ठेवून पूजा होत राहील, तर विरोधी पक्ष आम्हाला लक्ष्य करू शकतात.

संपादकीय भूमिका

हिंदूंनी कधीही शिखांना वेगळे समजलेे नाही आणि शिखांनीही आतापर्यंत हिंदूंना कधी वेगळे समजले नाही; मात्र खलिस्तानी विचारांचा प्रभाव शिखांमध्ये दिवसेंदिवस वाढू लागल्याने अशा घटना आता घडू लागल्या आहेत. हे लक्षात घेता शिखांमधील राष्ट्रभक्तांनी आणि समजूतदार लोकांनी समोर येऊन हिंदुविरोधी घटनांचा विरोध करणे आवश्यक आहे !

शिखांचा पैसा त्यांच्यासाठीच खर्च झाला पाहिजे ! – कमेटीचे माजी अध्यक्ष हरविंदरसिंह सरना

‘देहली सिख गुरुद्वारा प्रबंधक कमेटी’चे माजी अध्यक्ष हरविंदरसिंह सरना यांनी सांगितले की, कमेटीकडून चालवण्यात येणार्‍या शाळांमध्ये मूर्तीपूजेची परंपरा नाही. शिखांच्या मर्यादांना आव्हान देण्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. या शाळा कमेटीच्या पैशांनी चालतात आणि येथे सर्व धर्मांची मुले शिकतात. शीख कमेटीचा पैसा शिखांवर आणि त्यांच्या गुरूंच्या उपदेशांवर खर्च झाला पाहिजे.

संपादकीय भूमिका

‘हिंदूंचा आणि हिंदूंच्या सरकारीकरण झालेल्या मंदिरांचा पैसा हिंदूंवर अन् त्यांच्या धर्मावरच खर्च झाला पाहिजे’, अशी मागणी आता हिंदूंनी केली, तर आश्‍चर्य वाटू नये !