देशभरात प्रजासत्ताकदिन उत्साहात साजरा

नवी देहली – भारताचा ७४ वा प्रजासत्ताकदिन प्रतिवर्षीप्रमाणे देशभरात उत्साहात साजरा करण्यात आला. राजधानी देहलीतील कर्तव्यपथ (पूर्वीचे नाव राजपथ) येथे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी राष्ट्रध्वज फडकावला. यानंतर तिन्ही सैन्यदल, अर्धसैनिकदल, पोलीस दल आदींनी संचलन केले. तसेच विविध राज्यांच्या चित्ररथांचे प्रदर्शन करण्यात आले. या कार्यक्रमाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासहित केंद्रीय मंत्री, विविध देशांचे राजदूत, तसेच प्रमुख पाहूणे म्हणून इजिप्तचे राष्ट्रपती अब्दुल फतेह अल् सीसी हे उपस्थित होते.

सौजन्य एबीपी माझा 

महाराष्ट्राकडून साडेतीन शक्तिपीठे आणि नारीशक्ती या संकल्पनेवर आधारीत चित्ररथ सादर

येथील चित्ररथांच्या संचलनात महाराष्ट्राच्या चित्ररथाने पुन्हा एकदा सर्वांचे लक्ष वेधून घेतले. महाराष्ट्राने यापूर्वी ४० वेळा येथे चित्ररथ सादर केला आहे. महाराष्ट्रातील प्रसिद्ध साडेतीन शक्तिपीठे आणि नारीशक्ती या संकल्पनेवर आधारीत चित्ररथ सादर करण्यात आला. यात कोल्हापूरची श्री महालक्ष्मी, तुळजापूरची श्री तुळजाभवानी, माहूरची श्री रेणुकामाता हे ३ पूर्ण शक्तिपीठे, तर वणीची सप्तश्रृंगी हे अर्धे शक्तिपीठ यांची प्रतिकृती या चित्ररथाद्वारे सादर करण्यात आली.