निमंत्रणपत्रिका कशासाठी ?

(प्रतिकात्मक चित्र)

हिंदु धर्मानुसार १६ संस्‍कारांपैकी एक संस्‍कार आहे विवाह ! विवाह म्‍हटल्‍यावर नातेवाइक, हितचिंतक आणि ओळखीचे यांना निमंत्रण देणे, हे ओघानेच आले. निमंत्रण देणे म्‍हणजे विवाह कुठे, कोणत्‍या दिनांकाला आणि किती वाजता आहे, हे येणार्‍यांना समजणे, एवढाच उद्देश आहे. असे असतांना यासाठी किती खर्च करावा ? आणि निमंत्रण कशा पद्धतीने द्यावे ? याकडे लक्ष देणे आवश्‍यक आहे. सध्‍या एका निमंत्रणपत्रिकेचा खर्च काही रुपयांपासून सहस्रो रुपयेही आहे. आज काल श्रीमंतीचा देखावा करण्‍यासाठी एका निमंत्रणपत्रिकेवर सहस्रो रुपये खर्च केले जात आहेत. यामध्‍ये निमंत्रणपत्रिका सुंदर बॉक्‍समध्‍ये घालून त्‍यामध्‍ये मिठाई किंवा काही भेटवस्‍तूही दिल्‍या जातात. हे करण्‍यामध्‍ये काही प्रतिष्‍ठित व्‍यक्‍तींमध्‍ये कुठे तरी चढाओढही दिसते.

यातीलच एक प्रकार खर्‍या भारतियांना चीड आणणारा आहे. एका जिल्‍ह्यामध्‍ये एका उद्योगपतींनी त्‍यांच्‍या मुलाच्‍या विवाहाचे निमंत्रण देण्‍यासाठी पत्रिकेसह चांगल्‍या पद्धतीने सजवलेल्‍या एका खोक्‍यामध्‍ये ‘वाईन’ची (विदेशी दारू) बाटली दिली. ही घटना संतापजनक असून सर्व भारतियांना विचार करायलाही आणि लज्‍जेने मान खाली घालायला लावणारी आहे. यातून समाजातील एक घटक कोणत्‍या दिशेने जात आहे, हे समजते. खोका उघडल्‍यानंतर त्‍यात ‘वाईन’ची बाटली बघून मनावर काय परिणाम होणार ? हे वेगळे सांगायला नको.

समाजातील काही घटकांना श्रीमंती दाखवण्‍यासाठी कुठे आणि काय करावे ? हेही समजेनासे झाले आहे. यातून पैशांची उधळपट्टी होऊन एक प्रकारे स्‍वतःची पर्यायाने समाजाची हानी होत आहे. यावरून विवाह या पवित्र धार्मिक विधीकडे कशा पद्धतीने पाहिले जात आहे, हे लक्षात येते. विवाहातील प्रत्‍येक कृती धर्मशास्‍त्राला अनुसरून करणे आवश्‍यक आहे. असे असतांना घरातील मोठ्या व्‍यक्‍तींवरच संस्‍कार नसल्‍यामुळे ते चुकीच्‍या प्रथा पाडत आहेत. याचा परिणाम विवाह या विधीतून सात्त्विकता मिळून त्‍याचा लाभ भावी पती-पत्नींना होतांना दिसत नाही. विवाह हा मनोरंजनाचा आणि बडेजाव करण्‍याचा विषय बनत चालला आहे. हे सर्व थांबण्‍यासाठी समाजाला धर्मशिक्षण देणे आवश्‍यक आहे. धर्मशिक्षणाने व्‍यक्‍तीला कुठे आणि कसे वागायला हवे ? याची जाणीव होईल. यामुळे सरकारने आणि प्रत्‍येक व्‍यक्‍तीने धर्मशिक्षण घेण्‍यासाठी प्रयत्न करायला हवेत !

– वैद्या सुश्री (कु.) माया पाटील, देवद, पनवेल.