सातत्‍याने संगणकीय काम करणार्‍यांसाठी ‘२०-२०-२० चा नियम’ !

निरोगी जीवनासाठी आयुर्वेद : लेखांक १४०

आरोग्‍याविषयी शंकानिरसन

वैद्य मेघराज पराडकर

श्री. रजत वाणी, जळगाव : नेहमी दिवसातून ७ घंटे संगणकावर काम असते. त्‍यामुळे डोळ्‍यांवर ताण येतो. अशा वेळी काय करावे ?

उत्तर :

‘संगणकावर काम करतांना प्रत्‍येक २० मिनिटांनी साधारण २० सेकंदांसाठी २० फुटांपेक्षा लांब अंतरावर (उदा. खिडकीतून बाहेर दूर) पहावे किंवा २० सेकंदांसाठी डोळे मिटून हाताचे तळवे डोळ्‍यांवर ठेवावेत. याला ‘२० – २० – २० चा नियम’ म्‍हणतात.

‘eye care 20 20 20’, असे गूगलवर ‘सर्च’ केल्‍यास २० – २० मिनिटांचा गजर लावण्‍यासाठी विशिष्‍ट ‘अ‍ॅप्‍स’ही मिळतात.

वर्ष २०१३ मध्‍ये अमेरिकेमध्‍ये विद्यापिठातील ७९५ विद्यार्थ्‍यांकडून या नियमानुसार आचरण करवून घेण्‍यात आले. ‘केवळ एवढे केल्‍याने या विद्यार्थ्‍यांच्‍या डोळ्‍यांवरील ताण लक्षणीय रितीने न्‍यून झाला’, असे संशोधनामध्‍ये आढळले. कृती लहानशी वाटली, तरी पुष्‍कळ परिणामकारक असल्‍याने सर्वांनीच आचरणात आणावी.’

– वैद्य मेघराज माधव पराडकर, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१०.१.२०२३)