१. सनातन संस्थेचे दुसरे बालसंत पू. वामन अनिरुद्ध राजंदेकर यांना पाहिल्यावर मन निर्विचार होऊन ‘ॐ नमो भगवते वासुदेवाय ।’हा नामजप चालू होणे
‘मी काही दिवसांपूर्वी सनातन आश्रम, रामनाथी, गोवा येथे वास्तव्यास होते. एके रात्री मी भोजनकक्षाच्या बाहेर बसले होते. तेव्हा पू. वामन राजंदेकर त्यांच्या आईंच्या (सौ. मानसी राजंदेकर यांच्या समवेत) येत होते. मी पू.वामन यांच्याविषयीचा ग्रंथ वाचला होता; पण प्रत्यक्ष त्यांना प्रथमच पहात होते. त्या वेळी ‘त्यांच्याकडे पहातच रहावे’, असे मला वाटत होते. त्यांना पाहून सर्व साधक त्यांना भेटायला आले. त्यांना पाहून माझे मन निर्विचार झाले आणि त्यानंतर माझा ‘ॐ नमो भगवते वासुदेवाय ।’, हा नामजप चालू झाला.
२. पू. वामन बाळकृष्णाच्या रूपात दिसून भावजागृती होणे
त्यांना पहातांना ‘मी साक्षात् बाळकृष्णाला पहात आहे’, असे मला वाटले. त्यांचा चेहरा तेजस्वी दिसत होता. त्यांना पाहून मला धन्य झाल्यासारखे वाटले आणि माझी भावजागृती झाली. ‘त्यांच्या चरणी शरण जावे’, असे मला वाटले.’
– कु. जिगिषा दर्शन म्हापसेकर (वय १७ वर्षे), सिंधुदुर्ग (१९.६.२०२२)
|