सनातनचे १८ वे संत पू. (कै.) चत्तरसिंग इंगळे (वय ९२ वर्षे) यांच्‍याविषयी श्री. विजय लोटलीकर यांना जाणवलेली सूत्रे

१. पू. आजोबांना त्‍यांच्‍या देहत्‍यागाची कल्‍पना असणे

पू. (कै.) चत्तरसिंग इंगळे

१ अ. बोलण्‍यात पालट होणे : ‘एक दिवस पू. इंगळेआजोबा मोठ्या आवाजात तेही अनावश्‍यक असे बोलत होते. दुसर्‍या दिवशी त्‍यांचे बोलणे थोडे न्‍यून झाले. त्‍यांचे बोलणे आणि वागणे यांमध्‍ये जो पालट झाला होता, त्‍यावरून ‘त्‍यांना त्‍यांच्‍या देहत्‍यागाची कल्‍पना होती’, असे मला वाटले.

१ आ. ‘सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी जेवण पाठवले आहे’, असे सांगितल्‍यावर जेवणे : जेवतांना २ चमचे जेवले की, ते हाताने ‘बस्‍स !’ म्‍हणायचे; पण नंतर भरवल्‍यावर खायचे. ‘परम पूज्‍य डॉक्‍टरांनी (सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी) जेवण आणि खीर पाठवली आहे’, असे म्‍हटले की, ते जेवायचे अन् खीर प्‍यायचे. असे ते ३ दिवस जेवले.

१ इ. टप्‍प्‍याटप्‍प्‍याने सर्व क्रिया न्‍यून करून नंतर देहत्‍याग करणे : चौथ्‍या दिवशी त्‍यांना भरवण्‍याचा प्रयत्न केला, तर ते घास भरवल्‍यावर थुंकून टाकायचे. नंतर त्‍यांनी बोलणेही बंद केले. दोन दिवस ते केवळ पाणी प्‍यायले. तिसर्‍या दिवशी पुन्‍हा काहीच न घेता पुढील २ दिवस डोळे उघडून ते केवळ एकटक पहात राहिले. तेव्‍हा मला वाटले, ‘ते आता त्‍यांच्‍या देहत्‍यागाची वाट पहात आहेत.’ त्‍यानंतर त्‍यांनी डोळे बंद केले. मध्‍येच ३ – ४ घंट्यांनी ते ओरडले आणि नंतर पूर्ण दिवस पडून राहिले. तेव्‍हा मला वाटले की, आज ते देहत्‍याग करणार आणि २९.९.२०२२ या दिवशी रात्री त्‍यांनी देह ठेवला. वरील सर्व क्रिया त्‍यांनी टप्‍प्‍याटप्‍प्‍याने न्‍यून करत आणल्‍या. त्‍यांनी कोणतीही गोष्‍ट एकदम केली नाही.

२. पू. इंगळेआजोबा यांच्‍याविषयीची इतर सूत्रे

अ. पू. आजोबांना ‘सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचा ‘परम पूज्‍य’ असा जप करायचा’, असे सांगितले की, ते ‘हा करूया’, असे म्‍हणून नामजप करायचे.

आ. एकदा ते मला म्‍हणाले, ‘‘माझ्‍या लिखाणाच्‍या वह्या आहेत. त्‍या मी तुला देतो.’’ त्‍यांनी वह्या मागवून घेतल्‍या. काका त्‍यागी होते.

इ. कुणाचे पैसे ठेवलेले त्‍यांना आवडत नसे.’

– श्री. विजय लोटलीकर (आध्‍यात्मिक पातळी ६१ टक्‍के)  (वय ७० वर्षे), फोंडा, गोवा. (७.१०.२०२२)

साधिकेला आधार देणारे पू. (कै.) चत्तरसिंग इंगळेकाका !

साधिकेला कोरोना झाल्‍यावर पू. इंगळेकाकांनी तिच्‍या मनाची रुग्‍णालयात रहाण्‍याची सिद्धता करून घेणे : ‘कोरोना महामारीच्‍या काळात मी ११ दिवस रुग्‍णालयात भरती होते. त्‍या वेळी माझी शारीरिक स्‍थिती चिंताजनक होती. पू. इंगळेकाका प्रतिदिन मला भ्रमणभाष करायचे आणि सांगायचे, ‘‘तू घरी जाण्‍याची घाई करू नकोस. प्रकृती चांगली झाल्‍यावर घरी जा. रुग्‍णालयात रहावे लागले, तर आनंदाने रहायचे. ‘ते आपले प्रारब्‍ध आहे’, असे समजून शांत रहायचे.’’ आरंभी मला वाटायचे, ‘पू. काका असे का सांगत आहेत ? मी तर दोन दिवसांनी घरी जाणार आहे.’ नंतर मला ११ दिवस रुग्‍णालयात रहावे लागले. तेव्‍हा माझ्‍या लक्षात आले, ‘संत सर्वज्ञ असतात, ते भूतकाळ आणि भविष्‍यकाळ जाणतात.’ त्‍या वेळी माझी गुरुचरणी कृतज्ञता व्‍यक्‍त झाली. पू. इंगळेकाका मला जीवनातील कितीतरी कठीण प्रसंगांत नेहमी मार्गदर्शन करायचे.

‘गुरुकृपेनेच मला पू. इंगळेकाका यांच्‍याविषयीचे हे लिखाण करता आले’, यासाठी गुरुचरणी कोटीशः कृतज्ञता !’

– सौ. प्रगती खंगन, भिलाई, जिल्‍हा दुर्ग, छत्तीसगड. (७.१०.२०२२)

या अंकात प्रसिद्ध करण्‍यात आलेल्‍या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्‍तीनुसार साधकांच्‍या वैयक्‍तिक अनुभूती आहेत. त्‍या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक