वर्ष २०२२ मध्‍ये पुणे विभागात विनाअनुमती मद्यविक्रीमध्‍ये वाढ; ६ कोटी रुपयांचे मद्य जप्‍त !

पुणे – राज्‍य उत्‍पादन शुल्‍काच्‍या पुणे विभागाकडून अवैध मद्यविक्री करणारे, तसेच अवैध ठिकाणी मद्यसेवन करणार्‍यांच्‍या विरोधातील गुन्‍ह्यांत वर्ष २०२१ च्‍या तुलनेत वर्ष २०२२ मध्‍ये वाढ झाली आहे. या वर्षी गुन्‍ह्यांची संख्‍या ४३५ ने आणि अटक केलेल्‍या आरोपींची संख्‍या ६०० ने वाढली आहे. गेल्‍या वर्षात जप्‍त मुद्देमालाच्‍या किमतीमध्‍येही ५ कोटी ८६ लाख ४० सहस्र ६६२ रुपयांनी वाढ झाली आहे. अवैध मद्यविक्री करणार्‍यांच्‍या विरुद्ध, तसेच अवैध ठिकाणी मद्यसेवन करणार्‍या ग्राहकांविरुद्ध जिल्‍ह्यात जानेवारीच्‍या पहिल्‍या आठवड्यात राबवलेल्‍या विशेष मोहिमेत २९ जणांविरोधात गुन्‍हे नोंद करण्‍यात आले आहेत. या प्रकरणात २५ जणांना अटक करण्‍यात आली असून त्‍यांच्‍याकडून ३७ सहस्र रुपये दंड वसूल करण्‍यात आला. जादा दराने मद्यविक्री करणारे दुकान आणि देशी मद्याच्‍या बारमालकांच्‍या विरोधात १० गुन्‍हे नोंद करण्‍यात आले आहेत.

संपादकीय भूमिका

विनाअनुमती मद्यविक्रीमध्‍ये वाढ कुणाच्‍या प्रभावाने होते, हे शोधायला हवे. अशा प्रकारे कृती करणार्‍या समाजद्रोह्यांना कठोर शिक्षा होणे आवश्‍यक !