प्राचीन भारतीय संस्कृतीची परिपूर्णता आणि श्रेष्ठता आता कुठे जगाला पटू लागली आहे. भारतीय संस्कृतीने ज्या गोष्टी सहस्रो वर्षांपूर्वी सांगून ठेवल्या आहेत, त्यांचेच अनुसरण आज पाश्चात्त्य लोक वेगळ्या मार्गाने करतांना दिसतात. भलेही त्या गोष्टींना आधुनिक नावे दिली जात असतील; पण आशय भारतीय संस्कृतीचाच असतो. अशीच एक गोष्ट अलीकडच्या काळात ब्रिटनमध्ये मोठ्या प्रमाणात पहावयास मिळत आहे, ती म्हणजे ‘रेन्बो’ प्रथेची. तेथे शेजारी रहाणार्यांमध्ये एकोपा किंवा आपुलकी निर्माण होण्यासाठी ‘रेन्बो’ प्रथेची टूम निघाली आहे. विविध जाती-पंथांतील लोकांनी एकमेकांच्या शेजारी गुण्यागोविंदाने रहाणे, हा या प्रथेचा ढोबळमानाने आशय आहे. अगदी भारतीय संस्कृतीच्या परिभाषेतच सांगायचे झाले, तर ‘शेजारधर्म’ हा या प्रथेचा गाभा आहे. ब्रिटनमधील विविधता निर्देशांकानुसार, तेथे गेल्या २ दशकांत अशा प्रकारे भिन्न मूळ असलेल्या लोकांनी शेजारी रहाण्याचे (‘नेबरहूड डायव्हर्सिटी’चे) प्रमाण दुप्पट आहे, तर बोस्टन, लिंकनशायरमध्ये ते १० पट आहे ! थोडक्यात सांगायचे, तर तेथे ‘रेन्बो कल्चर’चे आकर्षण दिवसेंदिवस वाढत आहे. असे असले, तरी ‘हा खरेच शेजारधर्म आहे का ?’, याचा विचार करणे आवश्यक आहे. आपण या प्रथेच्या मुळाशी गेलो, तर ती किती उथळ आहे ? हे स्पष्ट होते.
‘रेन्बो’ प्रथेची उथळता !
मुळात ‘भिन्न मूळ असलेले लोक शेजारी राहिल्याने कुटुंबभावना निर्माण होईल’, हे वाटणे वरवरचे आहे. ‘एकमेकांच्या चालीरिती, रहाणीमान, जीवनशैली आदी ठाऊक नसल्याने एकमेकांविषयी दुरावा निर्माण होतो’, हे सत्य नाही. मुळात परकेपणा किंवा दुसर्याविषयी हीनत्वाची भावना मनात निर्माण होते. मनातील चुकीच्या कल्पना आणि अज्ञान हे भेदभावाचे मूळ आहे, उदाहरणार्थ, आज ‘रेन्बो’ प्रथा राबवणार्या ब्रिटनने ‘गोरे म्हणजे श्रेष्ठ आणि सावळे किंवा कृष्णवर्गीय, म्हणजे मागास’, अशा मागास विचारसरणीच्या आधारे भारतावर राज्य केले. त्या वेळी हेच ब्रिटीश गोर्यांना, म्हणजे इंग्रजांना अधिक वेतन आणि सुविधा देत असत, तर तेवढ्याच गुणवत्तेच्या किंबहुना इंग्रजांहून अधिक गुणवत्ता असलेल्या भारतियांना मात्र अपमानास्पद वागणूक देत. वास्तविक त्या वेळी इंग्रजांनी भारतियांची संस्कृती, जीवनशैली आदींचा जवळून अनुभव घेतला होता. तरीही त्यांच्या मनात भारतियांविषयी हीनत्वाची भावना होती. आता याच ब्रिटिशांच्या मनात आपुलकीची भावना वगैरे निर्माण होणे, हेही मृगजळच आहे. याउलट ऋषिमुनींनी सहस्रो वर्षांपूर्वी ‘कृण्वन्तो विश्वमार्यम्’, ‘वसुधैव कुटुम्बकम्’ अशी उदात्त संकल्पना मांडली. यावरून भारतीय संस्कृतीचे श्रेष्ठत्व आणि ‘रेन्बो’ प्रथेची उथळताच ठळकपणे अधोरेखित होते.
आज ब्रिटनमध्ये धर्मांधांकडून मोठ्या प्रमाणात स्थानिक, तसेच भारतीय यांना लक्ष्य केले जात आहे. धर्मांधांचा जो हैदोस चालू आहे, त्यामुळे ब्रिटीश पोलिसांना नाकीनऊ येत आहेत. अशा वेळी ‘वेगळ्या वेगळ्या जाती-धर्माचे लोक शेजारी राहून खरंच एकोपा साधला जाऊ शकतो का ?’, हा चिंतनाचा विषय आहे. याउलट भारतीय समाजव्यवस्था एक सर्वांगीण आणि प्रगल्भ व्यवस्था होती. ख्रिस्त जन्मापूर्वी भारतात आलेले विदेशी पर्यटक, अभ्यासक, इतिहासकार यांनी भारतीय समाजव्यवस्थेविषयी जे लिहून ठेवले आहे, त्यामध्ये कुठेही असमानता किंवा अन्य जातींविषयी हीनत्वाची भावना असल्याचा उल्लेख आढळत नाही. भारतात पुष्कळ काळ (ख्रिस्तपूर्व ३५०-२९०) वास्तव्य केलेला ग्रीक इतिहासकार मेगास्थनीज याने त्याच्या ‘इंडिका’ या पुस्तकात लिहिले आहे, ‘भारतीय लोक साधनसंपन्न आहेत. येथील लोकसंख्येत असंख्य आणि विविध जाती-प्रजातींचे लोक रहातात. त्यात एकही मूळ विदेशी नाही, तर सर्व स्थानिक आहेत.’ यावरून ‘ब्रिटनची आजची ‘रेन्बो’ प्रथा ही भारतात सहस्रो वर्षांपूर्वीपासूनच अस्तित्वात आहे’, हे लक्षात येईल.
भारतीय संस्कृतीतच खरा एकोपा !
सामाजिक एकोपा शेजारी रहाण्यातून साधला जाऊ शकत नाही; कारण तसे असते, तर काश्मीरमध्ये हिंदूंच्या शेजारी रहाणार्या धर्मांधांनी हिंदूंचा वंशविच्छेद केला नसता. आततायी ख्रिस्ती मिशनर्यांनी भोळ्या-भाबड्या हिंदूंचे धर्मांतर केले नसते. त्यामुळे ‘शेजारी रहाण्यामुळे सामाजिक एकोपा निर्माण होतो’, असे मानणे हेच मोठे मृगजळ आहे. खरा एकोपा निर्माण करायचा असेल, तर भारतीय (हिंदु) संस्कृतीचा अवलंब करण्याविना पर्याय नाही. भारताची मूळ वृत्तीच सामावून घेण्याची आहे; म्हणूनच तर ज्यू, पारशी आदी आश्रितांना भारताने सामावून घेतले. मनच व्यापक असेल, तर इतरांविषयी आपलेपणा निर्माण होण्यासाठी ‘अंतर’ हा निकष रहात नाही आणि दूर राहूनही आपलेपणाचा भाव निर्माण होतो; पण मनच कलुषित असेल, तर कितीही शेजारी रहा, आपलेपणा निर्माण होईलच, असे नाही.
‘रेन्बो’ अर्थात् इंद्रधनुष्यही तेव्हाच निर्माण होते, जेव्हा पाण्याच्या थेंबातून सूर्यकिरण आरपार जातात किंवा परावर्तित होतात; पण पाण्याचे थेंबच जर दगडासारखे असतील, तर सूर्यकिरण आरपार कसे जातील ? मन व्यापक असेल, तर केवळ माणसांविषयीच नाही, तर पशू-पक्ष्यांविषयीही आपलेपणा वाटतो. म्हणूनच तर संत एकनाथांनी तडफडणार्या गाढवाला गंगाजल पाजले, तर भुकेल्या कुत्र्याने पळवलेल्या पोळीवर तूप घालण्यासाठी संत नामदेव धावले. ही व्यापकतेची सर्वश्रेष्ठ परिभाषा होय ! त्यामुळे ब्रिटनमध्ये मूळ धरू लागलेल्या ‘रेन्बो’ प्रथेचे भारतीय संस्कृतीशी साधर्म्य असले, तरी दृष्टीकोनापासून आचरणापर्यंत भारतीय संस्कृतीचे श्रेष्ठत्व, तर ‘रेन्बो’ प्रथेची उथळता पावलोपावली जाणवल्याविना रहात नाही ! संत तुकाराम महाराजांनी सांगून ठेवलेच आहे की, ‘मृगजळ दिसे साचपणा ऐसें । खोटियाचें पिसें ऊर फोडी’ (अर्थ ः मृगजळ खर्या पाण्यासारखे भासते; पण त्या खोट्या पाण्याच्या वेडापायी ऊर फुटतो.) त्यामुळे ‘या मृगजळामागे धावायचे का ?’, हा शेवटी ज्याचा त्याचा प्रश्न आहे !
समाजात खरा एकोपा निर्माण करायचा असेल, तर हिंदु संस्कृतीचा अवलंब करण्याविना पर्याय नाही ! |