सोमयाजी दीक्षित श्री. प्रकाश आपटे यांच्या मार्गदर्शनाखाली सुर्ला (सांखळी) येथे विश्वकल्याणार्थ ‘पौर्णमास इष्टी’ संपन्न !

(इष्टी म्हणजे वेदांमध्ये सांगितलेल्या पद्धतीने केलेला यज्ञ)

‘पौर्णमास इष्टी’ची पूर्णाहुतीद्वारे सांगता करतांना  सोमयाजी दीक्षित श्री. प्रकाश आपटेगुरुजी

सांखळी (गोवा) – येथील सुर्ला येथे विश्वकल्याणार्थ ‘पौर्णमास इष्टी’ संपन्न झाली. साक्षात् भगवान परशुरामांकडून दीक्षा लाभलेले अग्निहोत्र उपासक म्हापसा (गोवा) येथील प.पू. महादेव आपटेगुरुजी आणि प.पू. (श्रीमती) सुशिला आपटे यांचे पुत्र सोमयाजी दीक्षित श्री. प्रकाश आपटे यांच्या मार्गदर्शनाखाली १७ जानेवारी या दिवशी वेदमूर्ती कै. कृष्णामामा केळकर यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ हा यज्ञ आयोजित करण्यात आला होता. सोमयाजी दीक्षित श्री. प्रकाश आपटेगुरुजी आणि त्यांची पत्नी सौ. प्रणिता आपटे यांनी अरणीमंथनाद्वारे अग्नी स्थापित करून यज्ञाला प्रारंभ केला. (विशिष्ट प्रकारच्या २ यज्ञीय काष्ठांचे मंथन करून अग्नी निर्माण केला जातो. त्याला अरणीमंथन म्हणतात. त्यासाठी ज्या उपकरणांचा वापर केला जातो, त्याला एकत्रितपणे ‘अरणीमंथा’ असे म्हणतात.) या यज्ञाचे पौरोहित्य वेदमूर्ती सुहोता आपटे, वेदमूर्ती विनय बापट आणि वेदमूर्ती राजेश काकतकर यांनी केले. पूर्णाहुतीने यज्ञाची सांगता झाली.

या शुभप्रसंगी सनातन संस्थेच्या श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ, सनातनचे साधक ६८ टक्के आध्यात्मिक पातळीचे श्री. प्रकाश मराठे, डॉ. अशोक मराठे, ‘प्रोग्रेस हायस्कूल’चे निवृत्त मुख्याध्यापक श्री. अरुण नाईक, माजी आमदार श्री. मोहन आमशेकर, ‘पतंजलि योग समिती’चे श्री. कमलेश बांदेकर, श्री. कमलाकर तारी आदी मान्यवरांनी या यज्ञाच्या दर्शनाचा लाभ घेतला. श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांनी यज्ञासाठी भूमी उपलब्ध करून देणारे श्री. विश्वनाथ केळकर आणि सौ. केळकर यांचा सनातन संस्थेच्या वतीने सत्कार केला.

या प्रसंगी सनातनच्या सौ. गिरीजा दयानंद गावकर यांनी ‘मकरसंक्रांत’ या विषयावर प्रवचन घेतले. स्थानिक महिला भजनी मंडळाच्या भजन गायनानंतर कार्यक्रमाची सांगता झाली.

अग्निहोत्र विश्वासाठी आणि सजीव सृष्टीसाठी उपयुक्त ! – वेदमूर्ती सुहोता आपटे

यज्ञानंतर उपस्थितांना यज्ञाविषयी माहिती देतांना वेदमूर्ती सुहोता आपटे म्हणाले, ‘‘जगात सर्वत्र पर्यावरणाचा र्‍हास होत आहे. प्रचंड प्रमाणात होणारी वृक्षतोड आणि समुद्रकिनार्‍याचा होणारा र्‍हास जगाला तीव्र गतीने विनाशाकडे घेऊन जात आहे. किरणोत्सर्ग थोपवण्यासाठी ऋषिमुनींनी वेदांना अनुसरून अग्निहोत्र करणे हा उपाय सांगितला आहे. अग्निहोत्र केल्यामुळे मनोविकार बरे होऊन मानसिक बल प्राप्त होते. मज्जासंस्थेवर प्रभावी परिणाम होतात. सर्वत्र रोगजंतूनिरोधक संरक्षककवच निर्माण होते. त्यामुळे आरोग्य सुधारते. अग्निहोत्रामुळे प्राणवायू (ऑक्सिजन) शुद्ध होऊन जीवसृष्टीवर इष्ट परिणाम होतो. वेदांनी पुरस्कृत केलेला हा यज्ञ संपूर्ण विश्वासाठी आणि सजीव सृष्टीसाठी उपयुक्त आहे. अग्निहोत्रामुळे वैचारिक आणि सामाजिक शुद्धी होते.’’

पवित्र यज्ञीय अग्नीचे रामनाथी येथील सनातनच्या आश्रमात शुभागमन !

सनातनच्या आश्रमात यज्ञीय अग्नी आणि भगवान परशुराम यांचे दर्शन घेतांना श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ

सुर्ला (सांखळी) येथे झालेल्या पौर्णमास इष्टीनंतर श्री. प्रकाश आपटेगुरुजी आणि त्यांची पत्नी सौ. प्रणिता आपटे यांचे पवित्र यज्ञीय अग्नी अन् भगवान परशुरामांची मूर्ती यांसह रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात शुभागमन झाले. सनातनचे साधक दांपत्य श्री. नीलेश आणि सौ. नंदिनी चितळे यांनी त्यांचे पाद्यपूजन, तसेच औक्षण करून स्वागत केले. इष्टी संपन्न झाल्यानंतर या यज्ञीय ज्वाळेवर अरणीमंथा धरला जातो, असा हा भारित अरणीमंथा म्हणजेच श्री अग्निनारायणाचे साक्षात् स्वरूप आहे. आश्रमात या अरणीमंथाच्या माध्यमातून श्री अग्निनारायणाचे आगमन झाले.

सोमयाजी दीक्षित श्री. प्रकाश आपटे यांचा सत्कार करतांना सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ, बाजूला  सौ. प्रणिता आपटे

अत्यंत कठीण शारीरिक स्थितीतही सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी श्री अग्निनारायण आणि भगवान परशुराम यांचे भावपूर्ण दर्शन घेतले. सनातनच्या श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ, सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांच्यासह सनातनच्या साधकांनीही दर्शनाचा लाभ घेतला.