दही खायचे आहे; पण त्‍याचा त्रास न होण्‍यासाठी काय करावे ?

खेर्डी (रत्नागिरी) येथील वैद्य समीर मुकुंद परांजपे यांचे सर्वसामान्‍यांसाठी आयुर्वेदाविषयी मार्गदर्शन

वैद्य समीर मुकुंद परांजपे

‘दही, ताक, पनीर इत्‍यादी दुधापासून बनलेले पदार्थ हे बहुधा सर्वांना प्रिय असतात; परंतु रुग्‍ण वैद्याकडे गेल्‍यानंतर त्‍याला अनेकदा हे पदार्थ बंद करण्‍याचा समादेश (सल्ला) दिला जातो. त्‍यामुळे पुष्‍कळ रुग्‍ण ‘आपल्‍याला दही-ताक खायला मिळणार नाही’, या विचाराने वैद्याकडे जाणे किंबहुना आयुर्वेदाची चिकित्‍सा घेणे टाळतात.

मूळात या पदार्थांना दोष नाही; पण त्‍यांची मात्रा (प्रमाण) अधिक असेल, तसेच ते खाण्‍याची वेळ चुकली, तर ते शरिरास त्रासदायक ठरतात म्‍हणजे भूक मंदावणे, अंगाला सूज येणे, घसा दुखणे, सर्दी इत्‍यादी लक्षणे निर्माण होतात. अनेकदा हे पदार्थ रात्री खाण्‍यात आले, म्‍हणजे केवळ दहीच असे नाही; पण साधे पाणीही पुष्‍कळ प्रमाणात रात्री प्‍यायले गेले, तर ते उर्ध्‍वजत्रूगत (कंठाच्‍या वरील) सर्व अवयवांमध्‍ये सूज निर्माण करते. हा केवळ ‘दही’ या पदार्थाचा दोष नसून ज्‍या पदार्थांमध्‍ये पाण्‍याचे आधिक्‍य आहे, असे सर्वच पदार्थ त्रासदायक ठरतात.

अगदीच मोठा रोग झालेल्‍या रुग्‍णाला हे पदार्थ बंद करायला लागू शकतात; पण निरोगी माणसाने दही-ताक अशा पदार्थांना घाबरून न जाता, ते खायचे असल्‍यास ते अल्‍प प्रमाणात (१ – २ चमचे) दिवसा खावेत (रात्री खाणे टाळावे). दही पचवणारे, तसेच त्‍याचे दुष्‍परिणाम दवडणार्‍या पदार्थांचे वर्णन आयुर्वेदात केलेले आहे. दही खातांना त्‍यामध्‍ये साखर, तूप आणि मध यांपैकी कोणताही १ पदार्थ घालून किंवा दह्याचे श्रीखंड करून खावे अथवा दह्यासह मूगाचे वरण किंवा आवळा असे पदार्थ खावेत. अशा सोप्‍या पद्धतीने दह्याचे दुष्‍परिणाम टाळून ते सुखाने खाता येऊ शकते !

‘अशा प्रकारे अनेक पदार्थ आपण युक्तीने खाऊन त्यांचे चांगले परिणाम मिळवू शकतो, तसेच त्यांच्यावर कांही संस्कार (त्यांच्या गुणांमध्ये अपेक्षित पालट) करून त्यांचे दुष्परिणाम टाळू शकतो !’ (३०.१२.२०२२)