सहस्रो भाविकांच्या उपस्थितीत सोलापूर येथे चैतन्यमय वातावरणात पार पडला श्री सिद्धरामेश्वरांचा अक्षता सोहळा !

सोलापूर – येथील ग्रामदैवत शिवयोगी श्री सिद्धरामेश्वर महाराज मंदिर परिसरातील संमती कट्ट्याजवळ ९०० वर्षांची परंपरा असलेला नंदीध्वजांचा अक्षता सोहळा १४ जानेवारी या दिवशी सहस्रो भाविकांनी अनुभवला. लाखो भाविकांनी श्री सिद्धरामेश्वरांच्या नंदीध्वजांवर तांदळाच्या अक्षतांचा वर्षाव केला. अपूर्व उत्साह आणि शिस्त यांचे दर्शन घडवणार्‍या या सोहळ्यास दुपारी २ वाजता प्रारंभ झाला. ‘एकदा भक्तलिंग बोला… हर्र… बोला हर्र..’चा गजर आणि ‘श्री सिद्धेश्वर महाराज की जय’, असा जयघोष होत होता. कोरोना महामारीमुळे सलग २ वर्षे भक्तांच्या अनुपस्थितीत झालेल्या अक्षता सोहळ्याला यंदा सहस्रो भक्तांची मांदियाळी जमली होती.

यात्रेसाठी मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे, महापालिका आयुक्त शीतल तेली, माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, आमदार सुभाष देशमुख, आमदार सचिन कल्याणशेट्टी, आमदार समाधान आवताडे, आमदार राजेंद्र राऊत, खासदार जयसिद्धेश्वर महास्वामी, माजी पालकमंत्री आमदार विजयकुमार देशमुख यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते, तर जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर आणि उपजिल्हाधिकारी तथा उपजिल्हा निवडणूक अधिकारी भारत वाघमारे यांनी बाराबंदीचा पोशाख परिधान केला होता. (बाराबंदी म्हणजे एक सदर्‍यासमान शिवलेले वस्त्र ज्यात छातीकडील भाग बांधण्यास बारा बंद असतात.)