महाबळेश्वर येथील एका अतीदुर्गम गावात ५ वर्षांच्या मुलीवर अत्याचार !

सातारा, १४ जानेवारी (वार्ता.) – महाबळेश्वर तालुक्यातील एका अतीदुर्गम गावात रहाणार्‍या ५ वर्षीय मुलीवर पाहुणा म्हणून आलेल्या ५९ वर्षीय व्यक्तीने अत्याचार केले. याविषयी पीडित मुलीच्या आजोबांनी महाबळेश्वर पोलीस ठाण्यात तक्रार प्रविष्ट केली. या तक्रारीवरून महाबळेश्वर पोलिसांनी संशयिताविरुद्ध पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा नोंद केला आहे. (समाजाची नीतीमत्ता किती खालावत चालली आहे, हे यातून लक्षात येते. समाजाची सात्त्विकता वाढण्यासाठी समाज धर्मशिक्षित करणे आवश्यक ! – संपादक)

संशयिताचे नाव रमेश कृष्णा जाधव असून तो नोकरीनिमित्त पुणे येथे वास्तव्यास आहे. पीडित मुलगी घरात एकटीच दूरचित्रवाणी संच पहात बसली होती. याचा अपलाभ घेत रमेश याने मुलीवर अत्याचार केले आणि खेड येथे पळ काढला. मुलीने ही माहिती आजोबांना सांगितल्यावर त्यांनी पोलिसात तक्रार केली. महाबळेश्वर पोलिसांनी खेड पोलिसांशी संपर्क साधून त्यांना माहिती दिल्यावर खेड पोलिसांनी तातडीने संशयिताला कह्यात घेऊन महाबळेश्वर पोलिसांच्या कह्यात दिले. संशयिताला न्यायालयासमोर उपस्थित केले असता ५ दिवसांची पोलीस कोठडी ठोठावण्यात आली आहे.