सिंधुदुर्ग : महसूल विभागाची वाळूच्या अवैध वाहतुकीच्या विरोधात धडक कारवाई

कणकवलीत ५ जणांना अटक, वैभववाडीत दंड, तर देवली येथे २६ डंपरना टाळे

(प्रतिकात्मक चित्र)

कणकवली – मालवण तालुक्यात वाळूची अवैध वाहतूक करणार्‍या ५ जणांना पोलीस कोठडी बजावण्यात आली, वैभववाडीत क्षमतेहून अधिक वाळूची वाहतूक करणार्‍या ९ ट्रकवर कारवाई करण्यात आली, तर देवली येथे २६ डंपरना टाळे ठोकले.

१२ जानेवारीला वाळूची अवैध वाहतूक करणारे डंपर मालवण महसूल विभागाच्या पथकाने पकडले होते. त्या वेळी काहींनी महसूल विभागाच्या पथकाशी बाचाबाची केली, तसेच शासकीय कामात अडथळा आणून पंचनामा करण्यासही आक्षेप घेत डंपर पळवून नेले होते. या प्रकरणी मालवणचे तहसीलदार श्रीधर पाटील यांनी दिलेल्या तक्रारीनुसार ५ संशयितांवर गुन्हा नोंद करण्यात आला होता. या संशयितांचा शोध घेऊन त्यांना कणकवली न्यायालयात उपस्थित केले असता न्यायालयाने त्यांना १६ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी बजावली आहे.

वैभववाडी येथे तहसीलदार प्रसन्नजित चव्हाण यांनी ४ दिवसांत क्षमतेहून अधिक वाळूची वाहतूक करणारे ९ ट्रक पकडून त्यांच्याकडून एकूण ४ लाख १० सहस्र ६१६ रुपयांचा दंड वसूल केला.

मालवण तालुक्यातील देवली सडा येथे वाळूचा अवैध साठा केलेल्या ठिकाणी १२ जानेवारीला मध्यरात्री सापडलेल्या २८ डंपरपैकी २६ डंपरना त्याच ठिकाणी टाळे ठोकण्यात (सील केले) आले. या डंपरचे चालक पसार झाले असल्याने सर्व डंपरचे मालक आणि वाळूचा अवैध साठा करून ठेवलेल्या भूमीचे मालक यांना, तसेच वाळूने भरलेल्या २ डंपरचे मालक यांना नोटिसा बजावण्याची कारवाई करण्यात आली आहे.

संपादकीय भूमिका

जिल्ह्यातील वाळू व्यवसायावर प्रशासनाने करडी नजर ठेवून अवैध कृत्ये करणार्‍यांना धाक वाटेल, अशी कार्यवाही करणे अपेक्षित !