गोवा : पर्यटनाशी संबंधित मोठ्या कार्यक्रमांसाठीच्या शुल्कात १० टक्क्यांनी वाढ

पणजी, १४ जानेवारी (वार्ता.) – राज्याच्या पर्यटन खात्याने पर्यटनाशी संबंधित कार्यक्रम आणि उत्सव यांसाठी अनुज्ञप्ती मिळवण्यासाठी शासनाकडे भरण्यात येणार्‍या शुल्कात १० टक्क्यांनी वाढ केली आहे. नवीन धोरणानुसारचे शुल्क पुढीलप्रमाणे आहे.

पूर्वी अनुज्ञप्ती नसलेल्या ५ सहस्र क्षमतेच्या स्थळी (जागी) पर्यटन मोसम काळात संगीत महोत्सव आयोजित करण्यासाठी सध्याचे शुल्क १० लाख रुपये आहे. याच ठिकाणी क्षमता ५ सहस्रांहून अधिक आणि १० सहस्रांपर्यंत असल्यास सध्याचे शुल्क १५ लाख रुपये आहे, तर १० सहस्रांहून अधिक क्षमता असलेल्या स्थळाचे शुल्क २० लाख रुपये आहे. वरील सर्व शुल्कांत सुधारित शुल्क धोरणानुसार १० टक्के वाढ करण्यात येईल. रात्रीच्या बाजारासाठीचे (नाईट बाझार) पूर्ण पर्यटन मोसमाचे शुल्क ६० सहस्र रुपये असेल. दुचाकी सप्ताह, कार रॅली, तिकीट नसलेले संगीत उत्सव, प्रदर्शने आणि युथ फेस्टिव्हलसारखे इतर पर्यटनाशी संबंधित कार्यक्रम यांच्यासाठी
(३० दिवसांपर्यंतचे) एकरकमी शुल्क ७५ सहस्र रुपये असेल. पर्यटन मोसम काळात हे कार्यक्रम झाल्यासच हे शुल्क आकारले जाईल. पर्यटन मोसम नसतांना (‘ऑफ सिझन’ म्हणजे प्रत्येक वर्षाचा १ जून ते ३० सप्टेंबर हा कालावधी) वरील सर्व कार्यक्रमांसाठीचे शुल्क मोसमात आकारण्यात आलेल्या शुल्काच्या एक पंचमाश (१/५) असेल, तर पर्यटन मोसम तेजीत (पीक सीझन – प्रत्येक वर्षाचा २० डिसेंबर ते ५ जानेवारी हा कालावधी) असेल, तेव्हा मोसमातील शुल्कापेक्षा ५ पट शुल्क आकारण्यात येईल. यात वस्तू आणि सेवा कराचा सहभाग नसेल.

या कार्यक्रमांच्या अनुज्ञप्तीसाठी खात्याकडे जमा करण्यात येणार्‍या सुरक्षा रकमेत कोणताही पालट करण्यात आलेला नाही.